कड्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांचा धुडगूस
केरूळ चौकात पान टपरी; आंबेडकर चौकात दोन दुकाना फोडल्या
--------------
कडा/ वार्ताहर
----------
येथील आंबेडकर चौकातील जय मल्हार मशिनरी आणि अशोक पशुखाद्य तर केरूळ चौकातील गणेश पान सेंटर या तीनही ठिकाणी एकाच दिवशी दुकानफोडी करून चोरट्यांनी लाखाच्या जवळपास ऐवज लंपास केला. सदर घटना शुक्रवारी मध्यरात्री कडा -धामणगाव रस्त्यालगत घडली.
आष्टी तालुक्यातील कडा येथील डॉ. आंबेडकर चौक ते केरुळ चौक, कडा- धामणगाव रस्त्यालगत चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुडगूस घालून दोन दुकानांसह एक पानाची टपरी फोडून लाखभर रुपयांच्या ऐवज लुटून पोबारा केला. कडा येथील आंबेडकर चौकातील धामणगाव रोडलगत असलेले मल्हारी पाचपुते यांचे, जय मल्हार मशिनरी व अशोक हजारे, यांचे अशोक पशुखाद्य ही दोनही दुकाने चोरट्यांनी मागच्या बाजूने फोडली. पाचपुते यांच्या मागच्या लोखंडी शटरचे कुलूप पट्टी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर काढून दुकानातील पंचावन हजाराची कॉपर वायर, आठ ते दहा हजाराचे पितळी नेपल आणि गल्ल्यातील पस्तीस हजाराची रोख रक्कम लांबवली. तर अशोक हजारे यांचे पशुखाद्य दुकान त्याच पद्धतीने फोडून त्यांच्याही गल्ल्यातील तीन-साडेतीन हजाराची रोकड व अडीचशे तीनशे रुपयांची चिल्लर चोरट्यांनी गायब केली. त्यांच्याच शेजारच्या नाझिया कलेक्शनच्या छताच्या पत्र्याचे हुक काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे त्याच दिवशी केरूळ चौकातील संपत परदेशी यांची पानाची टपरी फोडून चोरट्यांनी दहा हजाराच्या सिगारेट पाकिटांसह नगदी साडेआठ हजार लांबिवले. घटनास्थळी पीएसआय आजिनाथ काकडे यांनी भेट दिली. एकाच रात्री अनेक ठिकाणी दुकानफोडी झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे.
-------%------
stay connected