कड्यात मध्यरात्री व्यापा-याचे घर फोडले पोलिसांचा लाल दिवा पाहताच, चोरट्यांची भागंमभाग Crime News

 कड्यात मध्यरात्री व्यापा-याचे घर फोडले

पोलिसांचा लाल दिवा पाहताच, चोरट्यांची भागंमभाग



-----------------------

कडा / वार्ताहर

------------------

कडा येथील आडत दुकानदार दिलीप बलदोटा यांच्या घरातील दोन महिला व पुरुषांना शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीसह रोख रक्कम मिळून असा २ लाख  ३२हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सदर घटना रविवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कड्यातील धामणगाव रस्त्यालगत कन्या शाळेसमोर असलेल्या बलदोटा यांच्या घरी घडली.


याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, धामणगाव रस्त्यालगत असलेल्या भगिनी निवेदिता कन्या शाळेसमोर दिलीप बलदोटा व त्यांचे बंधू कुटुंबासह राहायला आहेत.

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला, मात्र तत्पूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरुवातीलाच तोडून काढले व घरातील वेगवेगळ्या रूम मधील कपाटे उचकून त्यातील रोख रक्कम एक लाख रुपये आणि एक लाख तीस हजाराचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन  लाख ३२ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला.  यावेळी घरात असलेले दिलीप बलदोटा व त्यांच्या पत्नी यांना जाग आली असता चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून घरात दहशत निर्माण केली. यावेळी  बलदोटा यांच्या बंगल्याजवळील एका घराच्या छतावर काहीजण मजूर झोपले होते. त्यांना अचानक जाग आल्याने चोरीचा संशय आला, म्हणून शेजा-यांनी पोलिसांना फोन केला व काही क्षणातच विभागीय रात्रगस्तीवर असलेले सपोनि विजय नरवाडे, पोशि सचिन गायकवाड, चालक प्रताप घोडके, पोकाॅ सय्यद मजहर, दीपक भोजे, या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेताच, पोलिसांना पाहताच त्या चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक करीत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत तात्काळ श्वान पथकासह अंगुली मुद्रापथकाला पाचारण करुन घटनास्थळाची पाहणी केली.  सदरचा पुढील तपास सपोनि नरवाडे करीत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे या ग्रामस्थ भयभीत झाले असून, कड्यातील पोलिसांनी हातात काठी व शिट्टी घेऊन गस्त करण्याऐवजी शस्त्र घेऊन रात्रीची गस्त वाढवावी. अशी मागणी होत आहे.

------%%-------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.