रुग्णांची संजीवनी : मंगेश चिवटे
प्रार्थनेसाठी जोडणाऱ्या दोन हातापेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात चांगला असतो
अशी निःस्वार्थ समाज सेवेची एक ओळख सांगितली जाते. सतत हसतमुख राहत जनतेच्या
सुख दुःखात सहभागी होत रात्री-अपरात्री मदतीचा हात असाच नेहमी पुढे करणारा
अवलिया म्हणून मंगेश चिवटे यांची ओळख महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात झाली आहे.
अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला
लागल्याचे दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात
प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. महाड-चिपळूण - इरसाळ वाडी
पूरग्रस्तांसाठी तातडीने धावून जाणे अशा अनेक प्रसंगामुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चेही
एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहार
म्हणून काम केलं आहे. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात चिवटे यांनी स्टार माझा,
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, साम टी व्ही, आय बी एन लोकमत या वाहिन्यांमध्ये विविध
पदांवर काम केले. सुमारे २०० हून अधिक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. २६/११ रोजीच्या
मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याच्या थरारक प्रसंगाचे त्यांनी ताज हॉटेलच्या येथून
कव्हरेज केले होते. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर पाक अतिरेक्यांचा हल्ला झाला, हॉटेल
ताज जवळ फायरिंग चालली होती. देशाच्या राजधानीत झालेल्या या घटनेचे गांभीर्य आणि
भयानकता देशवासींयाना माहिती व्हावी आणि त्याने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी
सजग व्हावे यासाठी मंगेशने बेडरपणे...जीवाची पर्वा न करता त्याचे वृत्त लाईव्ह पद्धतीने
देशवासीयांसमोर आणीत होते. तो दिवस मला आजही आठवतो आहे. सामाजिक भान
असलेली त्यांची पत्रकारिता अनुभवल्यानंतर....गेल्या काही वर्षांपासून गोरगरीब आणि
दीनदुबळ्यांच्यासाठी सामाजिक दृष्टीकोनातून सतत राबणारे मंगेश चिवटे आणि चेहऱ्यावर
सतत हसू आणि अंगी असलेल्या नम्रतेने तुमची दिवसरात्र चाललेली धडपड सुद्धा मी पाहत
आहे. तसंच काही काळ चिवटे यांनी दिल्लीतही पत्रकारिता केली आहे. वास्तवात हेच खरे
त्यांच्या साहसीवृत्तीचं द्योतक होय. पत्रकार म्हणून काम करत असतानाच मंगेश चिवटे
यांनी गोरगरीब रुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. या कामाला शासकीय
यंत्रणेची ताकद मिळावी, या हेतूने चिवटे यांनी २०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडली.
राज्यातील गरजू रुग्णांना मदत करण्याच्या हेतून सरकारच्या माध्यमातून हा कक्ष उभा
राहिला तर लाखो गरजवंतांना आर्थिक मदत मिळेल हे फडणवीस यांच्या लक्षात
आल्यानंतर व मंगेश चिवटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांनंतर ही
संकल्पना पूर्णत्वास आली आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो गरीब आणि
अडल्या-नडलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली. उद्धवसाहेब ठाकरे यांची सत्ता
आल्यानंतर शिवसेना भवन येथूनही काही काळ हे काम सुरु होते, महाविकास आघाडी
सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष त्यानंतर शिवसेनेचे
मुख्य नेते आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करून या कक्षाच्या
प्रमुखपदाची जबाबदारी घेत कामाला सुरुवात केली. मनात रुग्णसेवेचं वेड असलेल्या चिवटे
यांनी ठाण्यातून सुरू झालेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अल्पावधीतच राज्याच्या
कानाकोपऱ्यात पोहोचवला. दरम्यान, राज्यात २०२२ मध्ये झालेल्या ऐतिहासिक
सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच मंगेश चिवटे यांच्यावर
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपवली. कोरोनाच्या काळात त्यांनी
अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली
होती. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांच्यावर विश्वास टाकला आणि ही योजना अधिक
व्यापककरण्यासाठी त्यांना विशेष कार्य अधिकाऱ्याचा दर्जा दिला.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण
होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता. वैद्यकीय सहायता
कक्षातील त्यांनी केलेल्या रुग्ण स्नेही कामाचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांच्या कामाची
ओळख करून घेण्यासाठी मी स्वतःहा मंत्र्यालायातील त्यांच्या केबिनमध्ये बसून अवलोकन
केले आहे. थोडा मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात आले की, एकनाथ शिंदे यांच्या
कार्यकाळात व मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता मदत कक्षाचा
विस्तार तळागाळात पोहोचला होता.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याबाबत, व्यक्तिमत्वाबाबत कार्यपद्धतीबाबत
आणि त्यांचे एकूणच राज्यकारभार बाबत कितीही मतभेद असले तरी त्यांच्या वैद्यकीय
सहाय्यता निधीबद्दल मात्र राज्यभरामध्ये कमालीची कृतज्ञता आहे. कोणी खोक्याची उपमा
देते, कोणी गद्दाराची उपमा देते. अनेक लोकांना ते पटते तर अनेक लोकांना त्यांची बाजू
सत्याची वाटते. या सगळ्या संमिश्र प्रतिक्रियांमध्ये सध्या जनभावना आहेत. परंतु त्यांच्या
वैद्यकीय सेवेच्या मदती संदर्भात मात्र प्रत्येकाची एक वाक्यात आहे. गरजवंतांना आधार देत
प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण करणारा हितसंवर्धक म्हणून एकनाथ शिंदे यांचे कार्य उत्तुंग
आहे, गेल्या पन्नास वर्षात कुठल्याही मुख्यमंत्र्याचे वैद्यकीय उपचारासंदर्भामध्ये इतके कार्य
झाले नसेल इतके महान कार्य यानिमित्ताने घडत आहे.
सत्ताबदल झाला की, राज्याला जसा नवा मुख्यमंत्री मिळतो तसे नवीन मंत्रीमंडळ मिळते.
मंत्र्यांना नवीन बंगले मिळतात आणि बंगल्याना नवीन रंगरंगोटीसह नवीन फर्निचर
मिळते. असेच काही मंगेशरावांच्या बाबतीत घडले. राज्याला नवीन मुख्यमंत्री म्हणून
फडणवीस साहेब आल्यानंतर आरोग्य सहाय्यता कक्षातलं मंगेश चिवटे यांचं काम आज
संपुष्टात आले आहे. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले असे राजकारण
१९८५ नंतर घडत आले आहे. पूर्वी दिल्लीश्वरांच्या मर्जीने राज्याराज्यातले राजकारण वा
सत्तासंघर्ष होत असत. परंतु पुढे आघाड्या - युतींचे दिवस आल्यानंतर हा माझा तो
माझ्याजवळ आणि हा तुझा तो बाहेर असे दिवस आले आहेत. चिवटे यांच्याबाबतीत असेच
घडणार होते, ते याला अपवाद कसे असणार होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये लाखो रुग्णांना
एका फोनवर, मेसेजवर थेट मदत करण्याचं काम अत्यंत मनापासून करण्यात मंगेश यांनी
कसर ठेवली नव्हती. कधीही फोन केला तर ते उपलब्ध असत. कधी बिझी असेल थोड्या
वेळाने त्यांचा फोन येत असे किंवा दुसऱ्या मिनिटाला त्याच्या टीममधील लोक तत्परतेनं
फोन करुन प्रश्न मार्गी लावत होते. रुग्ण कोण आहे? किंवा काय यापेक्षा त्याला तातडीची
मदत कशी पोहोचेल यासाठी त्यानं अटोकाट प्रयत्न असायचा. काही नियम आडवे आले तर
मदतीचे अन्य मार्ग शोधले. रुग्ण आपल्याच कुटुंबातील व्यक्ती आहे या भावनेनं त्यानं काम
केलं. माणसांना पदं मिळतात, पण ती शंभर टक्के कशी लोकसेवेसाठी वापरता येतात, ते
मंगेशनं दाखवलं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या २
वर्ष २ महिन्यामध्ये ४०,००० हून अधिक गोरगरीय-गरजू रुग्णांना एकूण ३२१ कोटी
रूपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत
उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश
आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना
आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत आहे. एकनाथ शिंदे यांच्या
नेतृत्वाखालील महायुतीला पुन्हा एकदा महाराष्ट्रात यापूर्वी केव्हाही मिळाले नव्हते एवढे
बहुमत मिळले आहे त्यामध्ये तळागाळात पोहोचलेल्या या कामाचा सुद्धा सिहाचा वाट आहे
हे नाकारून चालणार नाही.
रुग्णदूत या नात्याने मंगेश चिवटे यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यासोबत माझे मैत्रीचे नाते
निर्माण झाले. आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या व्यासपीठावर कार्यक्रमाच्या
निमित्ताने मंगेशजींचे येणे झाले. विशेष म्हणजे मला आणि मंगेश चिवटे यांना २०२२ मध्ये
पत्रकारितेसाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने घोषित झाला. बाळशास्त्रींच्या
पोंभुर्ले या जन्मगावी लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांच्या हस्ते आमच्या दोघांचा
सत्कार झाला होता. त्यावेळी आम्ही दोघेही सहकुटुंब कोकणात उपस्थित होते. मंगेश यांचा
जन्म १५ जून १९८८ रोजी स्वातंत्र्य सेनानी साथी मनोहरपंत चिवटे (आजोबा) यांच्या
देशप्रेमी घराण्यात झाला. तर त्यांचे वडील पत्रकार आहेत. मंगेश चिवटे यांची शालेय
जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात
ओळख असायची, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एस.पी. कॉलेज मध्ये झाले.
त्यांनी मराठी विषयात एम.ए. करून नंतर बी.एड. केलं. याशिवाय चिवटे यांनी पत्रकारिता
विषयात पदवी संपादन केली. छंद म्हणून ते गड किल्ल्यांचा प्रवास करत आतापर्यंत
चिवटेनी ५० गड किल्ल्यांना भेटी दिल्या असून, पन्हाळगड ते पावनखिंड हा प्रवास ते गेल्या
१० वर्षांपासून सातत्याने करत आहेत.
द्वेष, मत्सर, निंदा, हव्यास, स्वार्थ आणि कटुता यांचे समिकरण आता अलीकडच्या भारतीय
राजकारणाचा स्थायीभाव बनला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शुद्ध विचाराचे आणि शुद्ध
आचाराचे राजकारण आज संपून गेले असून राजकारणातील आसुया ही आता राजकारणाचे
मुख्य सूत्र बनली आहे. पण याच राजकारणाच्या प्रांगणात जेव्हा केव्हा राजकारणविरहित
प्रेमाची, करुणेची आणि गरजेची आस निर्माण होत असते तेव्हा या राजकारणाला मंगेश
चिवटे यांच्या रूपाने पायाभूत असे माणुसकीचे झरे स्वभावतःच निर्माण होत असतात.
जीवा-भावाच्या नात्यागोत्यापेक्षा आणि हितचिंतक आणि स्नेह यांच्यापेक्षाही पुढे जाऊन
जेव्हा माणुसकीचा पाझर फुटत असतो तेव्हा ते व्यक्तीमत्व प्रामाणिक माणुसकीचे एक
उदाहरण बनत असते.
मंगेशराव आज तुम्ही हा 'कक्ष' सोडला असला, तरी तुम्ही केलेलं काम सामान्य माणसाच्या
कायम स्मरणात राहील..! या माणसाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता खऱ्या अर्थानं
घराघरात पोहचवली. हे करत असताना ना कोणाची जात पाहिली, ना कुणाचा धर्म, ना
कोण कुठून बोलतोय, ना कोण कोणाच्या मार्फत आलाय. तुमच्या कामामुळे हजारो कुटुंब
आयुष्यभर तुमचे ऋणी राहतील. मुख्यमंत्री सहायता कक्ष या विभागाला एका वेगळ्या
उंचीवर घेऊन जाणाऱ्या 'मंगेश चिवटे' नावाच्या माणसाच्या कामाला सलाम...!
stay connected