बाजारपेठेत 'लसणाने' केली 'कांद्यावर' मात
---------------
कांदा उत्पादक समाधानी : लसून 350 तर कांदा 45 रुपये प्रतिकिलो
---------------
कडा/ वार्ताहर
------------
मागील दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नवा लसूण बाजारात आला नाही. त्यामुळे लसणाने यंदा चांगलाच भाव खाल्ला. सध्या बाजारात लसूण चक्क 350 ते 400 रुपये प्रतिकिलो तर दर्जेदार कांद्याचा भाव प्रतिकिलो 40 ते 45 रुपये झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात कांद्यालाही लसणाची चांगलीच फोडणी बसल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
ऐन सणासुदीच्या कालावधीत कांदा, लसुन उत्पादकांना बाजारात चांगला भाव मिळू लागल्यामुळे पहिल्यांदाच अच्छे दिन आले आहेत. एक वर्षांपूर्वी जवळपास 400 ते 500 रुपये प्रतिकिलो वर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने पुन्हा दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. सध्या पाव किलो लसणाला 80 ते 100 रुपये मोजावे लागतात. तर दुसरीकडे बाजारात दर्जेदार कांद्याला देखील 40 ते 45 रुपये प्रतिकिलो एवढी भाववाढ झाली आहे. त्यामुळे कांदा लसणाने ऐन सणासुदीच्या कालावधीत पुन्हा एकदा चांगलाच भाव खाल्ला म्हणावा लागेल. त्यामुळे कांदा व लसूण उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हे ते अच्छे दिन आल्यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सर्वसामान्य गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे.
-------%-----
एमआरपीमुळे कांदा दरात वाढ
----------------
कडा कृषी उत्पन्र बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात सात ते आठ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. प्रथम दर्जाच्या कांद्याला 4000 ते 5100, क्रमांक दोनच्या कांद्याला 4000 ते 4500, तर क्रमांक तीनच्या कांद्याला 3000 ते 3500 हजाराचा कांदा उत्पादकांना भाव मिळाला. सरकारने एक्सपोर्टची एमआरपी कमी केल्यामुळे कांद्याच्या दरात भाववाढ झाल्याने शेतकरी देखील सुखावला आहे.
-बबलूशेठ तांबोळी, कांदा व्यापारी कडा
-----%%-----
पावसामुळे आवक घटली
--------------
मागील दीड ते दोन महिन्यापासून पावसाने कायम ठिय्या मारल्याने नवा लसूण आला नाही. त्यामुळे बाजारात लसणाची आवक घटली असल्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली असल्याचे किरकोळ लसूण विक्रेत्यांकडून सांगण्यात येते.
-------%%----
stay connected