सोयाबीनचा पेरा वाढला; भाजीपाला उत्पादकांची संख्या घटली आठवडी बाजारात टोमॅटोच्या लालीने शंभरी पार केली

 सोयाबीनचा पेरा वाढला; भाजीपाला उत्पादकांची संख्या घटली
आठवडी बाजारात टोमॅटोच्या लालीने शंभरी पार केली



---------------------------

राजेंद्र जैन/कडा

-------------

आष्टी तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झालेला असतानाही भाजीपाल्याचे दर मात्र अद्याप कायम वाढलेलेच आहेत. रविवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोच्या लालीने चांगलाच भाव खाल्ला असून, आता चक्क शंभरी पार केली आहे.

 

आष्टी तालुक्यात कांदा , उडीद , सोयाबीन यासारख्या पिकाचे प्रमाण जास्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.  त्यामुळे आठवडे बाजार आणि भाजी मंडई या ठिकाणी भाजीपाल्यांची आवक मर्यादित प्रमाणात असते.  मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे अनेकदा भाजीपाला वरच्या भावात खरेदी करावा लागतो.  पावसामुळे कोथंबीर,  मेथी आणि हिरवी मिरची स्वस्त झाली असली तरी टोमॅटो आणि भुईमुगाच्या शेंगा यांनी शंभरी पार केली आहे.  टोमॅटो १२० रुपये किलो तर भुईमूग १०० रुपये किलो या दराने  विकला जात आहे.  कारले , दोडका , घोसाळे , कोबी , फ्लॉवर या सारख्या फळभाज्यांचे  दर 80 रुपये किलो दरम्यान स्थिर आहेत. मेथी , पालक स्वस्त झाला असला तरी शेपू , चुका या पालेभाज्यांच्या दरात अचानक वाढ झाली असून जूडीचे दर दुपटीवर गेले आहेत. कांदा , बटाटा , लसूण याचे दर स्थिर आहेत. मात्र  टोमॅटोच्या दरात अचानक तेजी येत शंभर ते १२० रुपये प्रति किलो असा दर झाल्याने विक्रेते आणि ग्राहक ही चकित झाले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.