श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवारी भव्य शोभा यात्रा.
१३ व १४ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन,
आष्टी/प्रतिनिधी
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कड़ा या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी कड़ा शहरात भव्य दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे प्रधानमंत्री हेमंत पोखरणा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, उपाध्यक्ष बिपिन भंडारी, प्रधानमंत्री हेमंत पोखरणा, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, विश्वस्त उपाध्यक्ष बाबुलाल भंडारी, सदस्य संजय मेहेर, संतोष भंडारी, संतोष गांधी, अजय चोरबेले, संतोष शिंगवी हे मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित १२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा तर १३ व १४ जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. श्री. मोतीलालजी कोठारी माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावरून भव्य शोभा यात्रेस प्रारंभ होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बसस्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रभू श्रीराम मंदिर, जैन गल्ली मार्गे ही शोभायात्रा पुन्हा मार्केट यार्ड रोड मार्गे जाऊन केरुळ चौक ते मोतीलालजी कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात या शोभा यात्रेचे विसर्जन होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा' या गीताने या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे.
या शोभा यात्रेमध्ये पारंपरिक लोकवाद्ये, पारंपरिक लोककला व पारंपरिक लोककलावंतांबरोबरच संस्थेच्या शाळा. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी चे सजीव देखावे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या शोभा यात्रेल पारंपरिक सुर, सनई, चौघडा, तुतारी पथक, वासुदेव पथक, पिंगळा पथक, गोंधळ पथक, शाहिरी पथक, महिलांचे आदिवासी फुगडी नृत्य, नंदीवाला, किंगरीवाला, भोवरा व थाळी नृत्य, उंट, घोडे, रथ यांच्या सह शाळा महाविद्यालयातील विविध दिंडी पथक, राम राज्य पथक, बाल शिवाजी आणि मावळे, महाराष्ट्रातील कर्तबगार महिला, बाल विवाह प्रतिबंधक प्रबोधन पथक, महाराष्ट्रातील विविध भागातील महिला, गणेशोत्सव, ग्रंथ दिंडी, शाहिरी पथक, झांज पथक, लेझिम पथक, सावित्रीच्या लेकी, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी बाणा, फार्मा रथ, राधा कृष्ण व विविधतेतून एकता व सर्व धर्म समभाव हे सजीव देखावे सहभागी होणार आहेत.
मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सडा, रांगोळ्या काढून तसेच तसेच फुलांची उधळण करीत, तसेच विविध महापुरुषांना अभिवादन करीत व विविध कलांचे प्रदर्शन करीत ही शोभायात्रा निघणार आहे. डोळ्यांची पारणे फेडणारी वन भूतो न भविष्यती अशी ही वैशिष्ट्यपूर्ण महा शोभायात्रा कडा शहरातून प्रथमच निघणार आहे, तरी कडा शहरातील बालगोपाल, युवक - युवती, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, राजकारण, व्यापार, उद्योग, व्यवसाय, शेतकरी अशा सर्वांनी ही शोभा यात्रा पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाने केले आहे. या शोभा यात्रेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विविध प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे.
stay connected