बीड कलाकारांची वज्रमुठ! नाट्यगृह दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात कलावंतांचे लाक्षणिक उपोषण संपन्न...
बीड, प्रतिनिधी-
बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची बीड न.प. च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली असून तातडीने नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी नाट्यगृह बचाव समितीच्या वतीने बीड शहरातील कलावंतांनी काल दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायं चार वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना भरमसाठ भाडे आकारणे, साउंड व्यवस्थेत झालेला भ्रष्टाचार, लाईन मन असलेल्या व्यक्तीला व्यवस्थापक नेमल्यामुळे नाट्यगृहाचे झालेले गोडाऊन अशा अनेक समस्यांच्या विळख्यात नाट्यगृह सापडले आहे. दरम्यान नवनिर्वाचित उप विभागीय आधिकारी आणि नगर पालिका प्रशासक नायर मॅडम यांना नाट्यगृह बचाव समितीच्या वतीने याविषयी विस्तृत निवेदन देण्यात आले. नायर मॅडम यांना निवेदन देताना डॉ सतीश साळुंखे, डॉ सुधीर निकम, लक्ष्मीकांत दोडके, प्रतिक कांबळे, कैलास शिंदे, गौतम खटोड, मुकुंद धुताडमल, रविराज जेधे यांच्यासह बीड शहरातील अनेक कलावंत तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय आंदोलनात डॉ उज्वला वणवे, एजाज अली, विनोद दळवी, डॉ वारे, सुरेश साळुंखे, केशव भागवत, किशोर धुताडमल, देवा दहे, बाळू निसर्गंध यांच्यासह बीड शहरातील एकूण 46 कलाकारांनी प्रामुख्याने सक्रिय सहभाग नोंदवला होता. नाट्यगृह दुरुस्तीबाबत कलाकारांच्या या आंदोलनात बीड शहरातील कलाप्रेमी तथा नाट्यगृहाबाबत आस्था असणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील सहभागी झाले होते. दरम्यान रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, डॉ योगेश क्षीरसागर, नगरसेवक वाघचोरे, युवसेना अध्यक्ष अजय सुरवसे यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला. या आंदोलना दरम्यान किशोर धुताडमल व त्यांचे बंधू यांनी लोकगीत गायन, वादन करून सर्वांचे लक्ष वेधले. नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मोहीम प्रशासनाने तात्काळ हाती न घेतलतल्यास आम्ही सर्व कलावंत मिळून उग्र आंदोलन करू असा इशारा देखील बीड नाट्यगृह बचाव समितीकडून प्रसार माध्यमांना बोलताना देण्यात आला आहे.
सध्या नाट्यगृहात मोडलेला रंगमंच आणि फाटलेला मुख्य पडदा व विंगा पाहायला मिळतात. याबरोबरच तुटक्या खुर्च्या, बंद पडलेल्या लाइट्स, ए सी, अचानक बंद पडणारी साऊंड सिस्टम, तुटलेले सोफे, घाणेरडे स्वच्छतागृह याबरोबरच नाट्यगृहाच्या आवारात झाडांभौवती पडझड झालेली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबरोबरच अग्नीशमन व्यवस्था, पेयजल व्यवस्था, ग्रीन रुम व्यवस्था पुर्णतः कोलमडली आहे. तसेच नाटकासाठी आवश्यक नाट्यगृहातील ऑडियन्स लाईट व चेअर लाईट्स पुर्णतः बंद आहेत. हिंसक आंदोलना दरम्यान नाट्यगृहाबाहेरील शोभेचे आकर्षण असणाऱ्या काचा देखील मोठ्या फुटलेल्या आहेत. नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेबरोबर नाट्यगृहाच्या तिकीट विक्री रूममध्ये आणि पार्किंग विभागामध्ये रस्त्यावरील लाईट्स पोलच्या भंगार साहित्यासाठी गोडाऊन बनवण्यात आले आहे जी बाब कलाकार तथा बुद्धिजीवी रसिक श्रोत्यांच्या भावना दुखावणारी आणि कलेचा अपमान करणारी आहे. बीडच्या अनेक वृतपत्र तथा प्रसार माध्यमांनी नाट्यगृह दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केली परंतु बीड नगर पालिकेने नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे सातत्याने आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
नगर परिषदेने नाट्यगृहासाठी नेमलेला नाट्यगृह व्यवस्थापक हटावण्याची नितांत आवश्यकता असून कला क्षेत्रातील सुजाण असणाऱ्या एखाद्या कलावंतांची नाट्यगृहाचा व्यवस्थापक म्हणून निवड करावी. नाट्यगृहाचा नियुक्त व्यवस्थापक स्वतंत्र असावा नगर परिषदेने अत्यंत गंभीर्यपूर्वक आणि तात्काळ नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा विडा उचलावा अशा मागण्या आंदोलनात उपस्थित असलेल्या कलावंतांनी केल्या आहेत.
stay connected