महिलांवरील अत्याचार थांबवू न शकणारे सरकार उलथवून टाका! हातकणंगलेतील ‘होऊ द्या चर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 महिलांवरील अत्याचार थांबवू न शकणारे सरकार उलथवून टाका! हातकणंगलेतील ‘होऊ द्या चर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद




परस्त्री मातेसमान अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत महिलांवर अत्याचारांची मालिका सुरू आहे. कोणतीही महिला आज आपल्या कामाच्या अथवा वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षित नाही. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मानाला प्राधान्य न देणारे केंद्र व राज्य सरकार शिवरायांच्या भूमीतून उलथवून लावले पाहिजे, असे प्रतिपादन उपनेत्या, प्रवक्त्या संजना घाडी यांनी केले.


शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरकारच्या बोलघेवडय़ा आणि पोकळ घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातील शिरोळ येथील संवाद सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या संयोजनात सुरू असलेल्या या अभियानातील कोपरा सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तळागाळातील सामान्य माणूसही आपल्या मनात असणारा सरकारविरोधातील रोष संवाद सभेत व्यक्त करत आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, साजिदा घोरी, प्रतीक धनवडे, नीलेश तवंदरकर, संजय अनुसे आदी उपस्थित होते.


अच्छे दिन’ आणतो म्हणत ‘बुरे दिन’ आणले 


घरगुती गॅस सिलिंडर, डाळी, कडधान्यांचे वाढलेले भाव गगनाला भिडल्यामुळे महिलांचे घरच्या नियोजनाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील सर्वसामान्य महिला भगिनींना ‘बुरे दिन’ आणले. महिला, शेतकरी-कष्टकरी, कामगारविरोधी धोरणे स्वीकारून देशातील जनतेला देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारला उलथून टाका असा सूर जनतेतुन ऐकावयास मिळाला .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.