एक मराठा कोटी मराठा

 " एक मराठा कोटी मराठा "

----------------------------------------




मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सुमारे चार दशकांपूर्वीची आहे. महाराष्ट्राचे राजकारण, अर्थकारण, संस्कृती, शिक्षण वा इतर अनेक क्षेत्रात मराठा समाजाचा प्रभाव आहे तरी या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का येते आहे याचा ही कुठे तरी विचार होणं गरजेचे आहे.महाराष्ट्रातील बहुतांश मराठा समाजाचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे आणि आजची शेती पावसाच्या अनियमितपणामुळे कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकलेली असते दिवसेंदिवस बेभरावश्याची होत जाणारी शेती, पिकलेल्या शेत मालाला कवडीमोल मिळणारा भाव, त्यातच आरोग्याचे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, मुलींच्या लग्नाचे प्रश्न यातच शेतकरी खचून जातो व नैराश्यात अडकतो, काही शेतकरी तर आत्महत्येसारखा मार्ग जवळ करतात. खरं तर शेतीवर आधारीत अर्थव्यवस्था जर बळकट झाली असती तर आज होत असलेली मराठा आरक्षणची मागणी व त्याचा होत असलेला उद्रेक झालाच नसता. कोणत्या जातीला किती आरक्षण सवलती मिळतात त्यापेक्षा मराठा जातीला कुठलीच सवलत मिळत नाही याचे सर्वात मोठे शल्य मराठा तरुण तरुणीमध्ये निर्माण झाले आहे किंबहुना इथल्या अन्यायिक व्यवस्थेने ते निर्माण केले आहे असं म्हणलं तरी ते वावग ठरणार नाही. शिक्षण क्षेत्रात असलेल्या आरक्षण धोरणामुळे मराठा समाजातील हुशार व होतकरू तरुण तरुनींचे मोठे नुकसान होतं आहे त्यांना इतरांसारखी फीस व मार्क यामध्ये कुठलीही सवलत मिळत नाही त्यामुळे मराठा समाजातील गरीब घरातील मुले शिक्षणात, नौकऱ्यात मागे पडत आहेत हेच मराठा समाजाचे भयान वास्तव समाजासमोर येत आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा, विधानसभा, ज़िल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या सर्वां मध्ये मराठा समाजाची भूमिका कायम निर्णायक राहीली आहे कायम सत्त्ता कारणात मोठा वाटा ही मराठा समाजाला मिळतो परंतु या मोठ्या संख्येने असलेल्या गरीब मराठ्यांसाठी काही तरी करावे असे कुठल्याच पक्षाच्या राजकीय प्रस्थापीत नेतृत्व करणार्यांना कधी वाटले नाही. मराठा समाजाला आज जर आरक्षण मिळाले तर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबतीत काही तरी फायदा होईल या एका आशेवर मराठा समाज एकवटला आहे त्या मागणीसाठी आंदोलने, मोर्चे काढत आहे मागे राज्यात मराठा आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने 58 मोर्चे शांततेत निघाले. आरक्षण मागणीचा जोर लक्षात घेता ते तत्कालीन सरकारने दिले पण सर्वोच्य न्यायालयात ते टिकलं नाही पुन्हा त्यावरून मराठा आरक्षणाच्या राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या. मागणी करणाऱ्या मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्व्यकामध्ये ही आपापल्या सोयीचे वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले. सर्वसामान्य मराठा समाज मात्र ही सर्वं परिस्थिती पाहून आणखीन अस्वस्थ होऊ लागला परत मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही शक्यता त्याला दिसत नव्हती. हा सर्वं घटना क्रम चालू असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गोदावरी नदी काठी असलेल्या साष्टपिंपळगाव, भांबेरी, वडीकाळ्या या ठिकाणी बेमुदत उपोषण, साखळी उपोषण अशी आंदोलन चालू होती, ग्रामीण भागातील खरा गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील या सर्वं सामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या नेतृत्वात आंदोलनात सक्रिय होता. राज्यात फारशी कुठे याची चर्चा नव्हती. त्यातच अंतरवली सराटी या लहानश्या गावात मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले अनेक गावातील लोकं त्यांच्या बरोबर बसली त्यातच एक सप्टेंबर रोजी या आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला आंदोलकाकडून तुफान दगड फेक सुरु झाली व या आंदोलनाला हिंसक वळण लागले. महाराष्ट्रात ही बातमी गेली सामान्य लोकांपासून राजकारणी नेत्यांपर्यंत सर्वांची रीघ अंतरवली सराटी येथे लागली मनोज जरांगे या सर्वसामान्य युवकाचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले मराठा आरक्षण संदर्भात ठाम भूमिका मांडणारे मनोज जरांगे मराठा समाजला  प्रामाणिक व आपले वाटू लागले. त्यांनी उपोषण सलग सतरा दिवस चालू ठेवले मराठ्यांचे लाखो लोकं त्यांना भेटून पाठिंबा देण्यासाठी येऊ लागले. गोर गरीब मराठा समाजाच्या काळजात दाटलेली खदखद, समाजाची वेदना, आक्रोश मनोज जरांगे यांच्या शब्दातून व्यक्त होऊ लागला. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अंतरवाली सराटी येथे यावे लागले सर्वं लोकांसमोर तीस दिवसात यावर मार्ग काढू असा शब्द द्यावा लागला. जरांगे 

पाटलांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवस मुदत दिली व स्वतः मराठा समाजातील लोकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी राज्याचा दौरा सुरु केला त्यांच्या 12 दिवसातील 70 गावातील भेट दौऱ्याला मोठ्या सभेचे स्वरूप येऊ लागले लाखो लोकं  महिलांसहित रात्रभर त्यांची वाट पाहू लागले, त्यांचे आभार मानून सत्कार करू लागले. मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले.जरांगे पाटलांनी लोकांना 14 ऑक्टोबर ला अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले जेणेकरून समाजाची मागणी व ताकत सरकारच्या लक्षात येईल. मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक धडपड करणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील एकट्या तरुणाने या गरजवंत मराठा समाजाच्या काळजाला हात घातला आणि खऱ्या अर्थाने लाख नव्हे तर कोटी च्या संख्येने मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात स्वयंस्फुर्ती व स्वखर्चाने एकवटला आणि या आंदोलनाला चेहरा आणि दिशा मिळाली. केवळ मराठा आरक्षण ही एकच भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली, एक तर माझी स्वतःची अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल या शब्दामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज भावुक झाला त्यांच्या पाठीमागे सर्वं ताकतीने उभा राहिला.  ग्रामीण भागात सुरु झालेल्या या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून संख्येने मोठा असलेला मराठा समाज कायमच अठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालला आहे. आज गरीब असलेल्या मराठा समाजावर वेळ आहे त्यांना सर्वं जाती धर्मातील लोकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे.हा लढा अंतिम टप्यात येणं  आता गरजेचे आहे, केंद्र व राज्य सरकारने वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे नाहीतर अंतरवली सराटी येथे जमलेला दीड कोटी मराठा समाजाचा महाप्रलंय कोणती भूमिका घेईल हे आज तरी सांगणं कठीण आहे कदाचित जरांगे पाटलाच्या भाषेत हे आंदोलन सरकारला झेलणार व पेलणार सुद्धा नाही कारण महाराष्ट्रात आता एक मराठा लाख मराठा नाहीतर  अंतरवली सराटी येथे एक मराठा कोटी मराठा झालेला सर्वं जगानी पाहिलं आहे ...!!


लेखक -

प्रा. महेश कुंडलिक चौरे,

आष्टी.

मो. 9423471324








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.