" गांधीयुग "
***************
महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महान योगदानामुळे त्यांना राष्ट्रपीता म्हणून ओळखले जाते,त्यांचे पूर्ण नाव मोहनचंद करमचंद गांधी असे होते,त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला.इंग्लंड मध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले व भारतात परत येऊन त्यांनी काही दिवस वकिली केली,त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत घालवली,तेथे त्यांना भारतीय वंशाच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीला व भेदभावला सामोरे जावे लागले,अशा परिस्थितीत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.1915 मध्ये ते भारतात परतले व नंतर काँग्रेस या पक्षामध्ये सामील झाले त्यांनी ब्रिटीश सरकार विरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू केले.त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ने ब्रिटिश सरकारचा विरोध करण्यासाठी अहिंसक असहकार आंदोलने सुरू केली,1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले त्यामुळेच इंग्रजांना आपला देश सोडणे भाग पडले आणि अशा प्रकारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
महात्मा गांधीनी आयुष्यभर सत्य व अहिंसा या तत्वाचा पुरस्कार केला,शस्त्र आणि हिंसा कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकत नाही उलट त्यामुळे समस्या वाढते असे त्यांचे मत होते.गांधीजींनी अहिंसेचे तत्व स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते प्रथम व्यक्ती होते हिंदू,बौद्ध, जैन धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्वांचा उल्लेख आहे,माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रात त्यांनी अहिंसेचे तत्वज्ञान मांडले आहे.उद्याच्या शांतता प्रिय समाजासाठीचे महात्मा गांधी हे एक आदर्श होते,रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले, गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजी आपल्या गुरूस्थानी मानत असत.स्त्रीयांना समान अधिकार, अस्पृश्यता निवारण,सर्वधर्म समभाव या विचारांचा त्यांचा आग्रह असे,कळत्या वयात शाकाहारी जेवण व स्वतःच वयक्तिक जीवन अगदी साध्या पद्धतीने जगून समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी ठेवला.
गांधीजींनी त्यांच्या व्यक्तीगत जीवनात आलेला मानअपमान फारसा कुरवाळला नाही,त्यांना आलेल्या समाजातील कटू अनुभवामुळेच ते अंतर्मुख झाले व त्यांनी मोठा लढा सुरू केला,आलेल्या अनुभवातून निराश व आक्रमक न होता नित्य चिंतनातून त्यांनी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.भारतीय तत्वज्ञान व अध्यात्म यांचा अभ्यास करताना भारतीय विचारावर त्यांची प्रचंड श्रध्दा बसली त्यातून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजालाच एकत्र करून सत्याग्रह या मार्गाचा अवलंब सुरू केला व इंग्रज साम्राज्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले.आध्यत्मिक चिंतनाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनातच प्रार्थना, उपवास, आश्रम व्यवस्था, स्वदेशीचा पुरस्कार, सत्य व अहिंसा या तत्वाचे पालन सर्वांच्या वयक्तिक जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्यांच्या सर्व चळवळी व आंदोलनाचा आधारच ही तत्वे होती.गांधीजींचे हे तत्वे माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू पडतात म्हणूनच पंडित नेहरू असोत की नरेंद्र मोदी यांना कोणालाही गांधींना सोडता येत नाही.भारतीयांमध्ये अफाट सामर्थ्य निर्माण करणारा हा सत्यसेवक व त्याच्या सत्याग्रहाचा प्रयोग ही भारताची जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे म्हणूनच गांधीजी गेल्या दोन दशकातील जगातील सर्वाधिक चर्चित व्यक्तिमत्त्व आहे,जगात शंभरहून अधिक देशात त्यांची स्मारके आहेत,त्यांच्या नावाचे रस्ते,त्यांचे पुतळे,पोस्टाचे तिकीट वा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गांधीजींची स्मृती हे देश जपत आहेत,त्यांच्या पासून प्रेरणा घेत आहेत.आइन्स्टाइन गांधीजी बद्दल असे म्हणतो की 'जे कार्य गौतम बुद्धांनी सुरू केले ते गांधींनी पूर्णत्वास नेले' गांधी हत्येनंतर एक ख्रिश्चन तत्वज्ञ तर असे म्हणतो की 'येशू ख्रिस्तानंतर एकमेव ख्रिश्चन आज मृत्युमुखी पडला' गांधींचा त्यांच्या विचारांचा कायमच सर्व जगाणे सन्मान केला.
स्वतःसाठी चरखा वापरत असताना त्यांच्या लक्षात आले की शिक्षण क्षेत्रात सुद्धा स्वावलंबी शिक्षण असणे आवश्यक आहे,म्हणून तालीम या नवीन शिक्षण पद्धतीचा विचार त्यांनी मांडला त्यांच्या मते मूलभूत शिक्षणा बरोबर उपयुक्त व्यवसायीक कौशल्य असलेले शिक्षण सर्वांना मिळणे आवश्यक आहे,विशेष ग्रामीण विकासाचे सर्वात मोठे आव्हान योग्य शिक्षण व व्यावसायिक कौशल्य हेच आहे त्यामुळे खरे शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होऊन समाजातील मागास सर्वच घटकांचे शोषणमुक्त व समानता आधारित सामाजिक विकास करणे शक्य होईल, प्रत्येकाला आपल्या भागातच उदरनिर्वाह करण्याचे पर्याप्त साधने त्यामुळे निर्माण होतील,महात्मा गांधीनी त्यावेळी सांगितलेल्या नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब आता येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात राबविण्याचे सरकारने ठरविलेले आहे.
महात्मा गांधींनी स्वतःचे आत्मचरित्र असलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक लिहिले त्यात त्यांनी स्वतःच्या जीवनात केलेल्या प्रत्येक चुका प्रामाणिक कबूल केल्या व जगण्या विषयीचे तत्वज्ञान समाजासमोर सोप्या भाषेत सांगितले जसे की धैर्य म्हणजे स्वतःची परीक्षा पाहणे,कोणालाही जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका, कोणी आपल्याला कितीही डीवचण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे,माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखवू शकणार नाही,जग बदलण्याआधी स्वतःला बदला, आपला स्वाभिमान आपल्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,गरजूंच्या सेवेत स्वतःला समर्पित करा,बलहीन व्यक्ती कोणालाही इजा करू शकत नाही क्षमा करणे हेच बलवान व्यक्तीचे काम आहे, मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडून येते,आपण जीवनात एखादे काम हाती घेतले तर आपले अंतःकरण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वराकडे सोपवावे,स्वतःवर प्रभुत्व व विश्वास असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे व विश्वास ठेवणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.
आजही जगभरात गांधी विचारांचे वारे वेगाने वाहत असताना भारतातील काही वर्ग मात्र आपल्या राष्ट्रपित्याला नाकारण्याच्या पवित्र्यात कायमच असतो निदान तसे चित्र सामाजिक व अन्य माध्यमातून उभे केले जाते,गांधीजींना त्यावेळी तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन करून काही कटू निर्णय घ्यावे लागले असतील, कदाचित देशहीत व समाजहीत समोर ठेवून ते घेणे गरजेचेही असेल,मग त्यावेळी त्या परिस्थितीत घेतलेले निर्णय चूक होते की बरोबर होते,ते निर्णय त्यांना का घ्यावे लागले असतील याचा कुठलाही अभ्यास न करता फक्त गांधीजींना अपुऱ्या महितीअभावी दोष देणे व आपले द्वेषवर आधारित असलेले राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या हत्येनंतरही त्या संबंधीचा वाद उभा करण्याचे अभियान कायम चालू असते त्यामुळे कसलेही राजकीय ज्ञान नसलेला तरुणवर्ग,स्वार्थापलीकडे काहीही पाहू न शकणारा मध्यम वर्ग व अविकसित राहिलेला वंचित समूह हे सर्व समाज घटक गांधीजी व त्यांच्या विचारापासून दुरावलेले दिसतात.आजच्या 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या पावन दिवशी या समाजघटकांनी गांधीयुगाचा थोडा जरी अभ्यास केला व खरे गांधी विचार त्यांच्या समोर आले तर काही प्रमाणात समाज मनावर असलेला गांधीजी यांच्या बद्दलचा गैरसमज दूर होईल व सत्यावर आधारित असलेले या महात्म्याचे महात्मा पण सर्व भारतीय समाज मनावर अधोरेखित होईल...!!
लेखक-
प्रा.महेश कुंडलिक चौरे,
आष्टी.
मो.9423471324


stay connected