युवा महोत्सवात एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची छाप
उल्हासनगर दि :- मुंबई विश्वविद्यालयाच्या अत्यंत प्रतिष्ठित व मानाच्या अशा 'युवा महोत्सवात' मध्ये एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुरुवातीलाच आपली छाप सोडली आहे.
उल्हासनगर मधील सीएचएम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'झोनल राउंड' मध्ये फाईन आर्ट आणि लिटररी इव्हेंट्स मध्ये एस एस टी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम आणि द्वितीय पारितोषिकांवर आपले नाव आधीच कोरले आहे. नुकत्याच कल्याण येथील बी के बिर्ला महाविद्यालयात पार पडलेल्या परफॉर्मिंग आर्ट्सच्या स्पर्धांमध्ये एस एस टी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली. नृत्य, संगीत आणि नाट्य विभागात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे आपल्या नावे केली.
पथनाट्य (हिंदी) गटात एस एस टी महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक पटकावले. तर माईम स्पर्धेत द्वितीय स्थान मिळवले. तसेच भारतीय लोकनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकावर एस एस टी चे नाव कोरले गेले. याशिवाय, मराठी पथनाट्य, मोनो एक्टिंग आणि भारतीय समूह गीत या स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. या फेरीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड झाली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे झोनमधून एकूण ४७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत एकूण ११ स्पर्धांमध्ये एस एस टी महाविद्यालय सहभागी होणार आहे. सांस्कृतिक विभागाच्या या विद्यार्थ्यांचे कॉलेजच्या व्यवस्थापन, प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग, अन्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक होत असून पुढील फेरीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.


stay connected