लेकीला भेटण्यासाठी आलेल्या आईला कारची धडक; लेकीची भेट राहिली अधुरी
मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आईला रस्ता ओलांडताना कारचा धक्का लागला व याचवेळी पाठीमागून येणाऱ्या बसखाली वयोवृद्धा सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान धानोरा बसस्टॅण्ड समोर घडली. तायराबी शेख (७०, रा. कुक्कडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. धानोरा येथील सुप्रसिद्ध चिकन व्यापारी चांदभाई शेख यांच्या त्या सासु होत्या .
VDO पहा
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील तायराबी शेख आष्टी तालुक्यातील धानोरा येथे राहत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. धानोरा येथे उतरल्यानंतर त्या मुलीच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना अहमदनगरवरून जामखेडकडे जाणाऱ्या कारने (एमएच १३, एजे. १९००) त्यांना धक्का दिला. यावेळी भोकरवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या बसखाली (एमएच. २०, बीएल. ४०१०) तायराबी शेख सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बाबू तांदळे, भरत माने यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहावर कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. अंभोरा पोलिस ठाण्यात अपघातातील दोन्ही वाहने लावण्यात आली आहेत. काल दि . ३ ऑगस्ट रोजी शोकाकूल वातावरणात मृत महिलेचा कुक्कडगाव येथे दफनविधी करण्यात आला . सदरील घटनेने धानोरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . धानोरा बसस्थानक परिसरात रस्त्यावर गतीरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत .
अवघे १०० मीटर अंतरावर होती लेक.....
१०० किलोमीटरवरून आलेल्या आईला मुलीच्या घरी जाण्यासाठी केवळ १०० मीटर अंतर पार करायचे होते. पण, एवढ्या अंतरावर येऊनदेखील माय लेकीची भेट अधुरी राहिली.


stay connected