विशेष लेख
----------------
प्रा. महेश चौरे
---------------------
49 वर्षांत हंबर्डे महाविद्यालयातुन हजारो आदर्श विद्यार्थी घडवले
---------------------------------------
आपल्या समाजाला आज ज्या सक्षम नागरिकांची गरज आहे अशा सक्षम नागरिक घडविण्यास मदत करण्यासाठी शिक्षण, नैतिक व अध्यात्मिक मूल्ये व शिस्त प्रदान करण्याचे आपले ध्येय ज्या शैक्षणिक संस्थेने ज्या अद्धभूत मार्गांनी पूर्ण केले आहे त्याच संस्थेला खऱ्या अर्थाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा अधिकार असतो. कुठल्याही संस्थेचे वय हे ती संस्था किती वर्षांपूर्वी स्थापन झाली यावरून ठरत नाही तर ते ठरत संस्थेचा चालक व कर्मचाऱ्यांच्या सतत बदलतं आणि सतत नव्या वाटा शोधत राहणाऱ्या क्षमतेवर, त्यामुळे रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव वगैरे टप्पे साजरे करणाऱ्या संस्थेच्या वाढत्या वयाचे निदर्शक नसून एवढा दीर्घकाळ उलटूनही संस्थेने आपले तारुण्य आबाधित राखण्याचे ते उत्सव असतात.
सन 1972 मध्ये आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था असंख्य अडचणीवर मात करत शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण विध्यार्थ्यांपर्यंत पोहचवीने या उदात्त हेतूने स्थापन केली गेली.
त्यावेळी बीड ते नगर या दोन्ही ज़िल्ह्याच्या मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी एकही महाविद्यालय नव्हते. आष्टी तालुक्यातील सर्वच समाज घटकातील लोकांना इथे विध्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय असावे असें वाटायचे त्यातूनच चर्चा सुरु झाल्या, महाविद्यालय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले शासनाकडे मागणी सुरु झाली.
सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी यासाठी आष्टीच्या नागरिकांकडून गावबंद, मोर्चा, रास्तारोको असें आंदोलन करण्यात आले. सरकारनेही या मागणीची दखल घेऊन नवीन महाविद्यालय निर्मितीस परवानगी दिली व तसे प्रस्ताव मागवण्यात आले. तत्कालीन बीड जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी त्यांच्या संस्थेमार्फत आष्टी साठी पहिला प्रस्ताव पाठवला परंतु आष्टीला मंजूर झालेले महाविद्यालय आष्टीच्या लोकांनीच चालवावे या हेतूने ऍड. बन्सीधर हंबर्डे, ऍड. बबनराव देशपांडे, ऍड. चंद्रकांत आजबे,मनसुखशेठ मेहेर,साहेबराव थोरवे, विठ्ठलराव रेडेकर , अंबुतात्या रसाळ, शांतीशेठ वर्धमाने, जानदेव हंबर्डे अकबर शेख, श्रीधर दुशी,या समाजातील प्रतिष्ठित लोकांनी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. तसा मागणी प्रस्ताव तयार केला गेला तत्कालीन आमदार भाऊसाहेब आजबे यांनी या कामी संस्थेच्या या लोकांना खूप सहकार्य केले. शासनाची अनामत रक्कम भरण्यासाठी संस्थेने वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. शासनाकाडे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत कमी होती रक्कम गोळा करण्यात विलंब होत होता त्यावेळी बीड ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आष्टी येथील शाखेत ऍड. बन्सीधर हंबर्डे यांचे मित्र व मेव्हणे तसेच आमदार भाऊसाहेब आजबे यांचे विश्वासू के. बी.चौरे यांच्या कडे बँकेच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी होती. त्यांनी बँकेची दैनंदिनी रोख किर्द बंद न करता कमी पडत असलेले पस्तीस हजार रुपये कुठलीही नोंद न करता संस्थेला सरकारकाडे भरण्यासाठी हातावर दिले पुढे काही दिवसात आ. भाऊसाहेब आजबे यांनी स्वतःचे दहा हजार रुपये दिले व इतर सदस्यांनी वर्गणी गोळा करून बँकेच्या त्या पस्तीस हजार रुपयांचा भरणा करून मागील तारखेत ती रोख किर्द बंद केली.
आ. भाऊसाहेब आजबे व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांच्या आग्रही मागणीमुळे संस्थेला महाविद्यालय मंजूर केले गेले व त्याचा पायाभरणी सभारंभ स्वतः मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते आष्टी येथे पार पडला. महाविद्यालय चालविण्यासाठी बंद असलेल्या यशवंत ऑईल मिलचे गोडावून व जागा देण्यात आली.
संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकमताने ऍड. बन्सीधर हंबर्डे यांची अध्यक्ष व ऍड. बबनराव देशपांडे यांची सचिव म्हणून नेमणूक केली. त्यांच्या पुढे महाविद्यालय चालवीण्यासाठी पैसे, जागा, उपकरणे व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग याशिवाय अगदी सगळ्याच गोष्टीची शून्यातून निर्मिती करण्याचे मोठे आव्हान होते. या सर्वावर मात करून बन्सीधर हंबर्डे यांनी महाविद्यालय दिमाखात चालू केले.
या महाविद्यालयाने गेलेल्या 49 वर्षांमध्ये अनेक विध्यार्थी घडवले ग्रामीण भागातील विधार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय झाली. तेच विद्यार्थी आज सामाजिक, राजकीय, व्यायासायिक, शासकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कला ,विज्ञान,क्रीडा, सैन्यदल शेती वा विविध सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वचा ठसा राज्यात, देशात उमटवत आहेत.
संस्थेने 50 वर्षांत अनेक जाती धर्मातील लोकांना त्यांच्यातील ज्ञान कौशल्यच्या आधारे नौकरीला घेतले.
मुळातच संस्थेच्या संस्थापकांची व्यापक दूरदृष्टी असल्यामुळे संस्थेचा मूळ पायाच शाश्वत मूल्यांवर कायम आधारित राहिला. अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक, कर्मचारी वर्ग तसेच प्राचार्य देशमुख प्राचार्य के. बी.चौरे तसेच आजचे प्राचार्य निंबोरे या सर्व कार्यालयीन प्रमुख व कर्मचाऱ्यांची मोठी विस्तृत परंपरा त्याला लाभली.
आज आपण जर जगभरातल्या शैक्षणिक व सेवाभावी संस्थाचा आढावा घेतला तर कोणताही मोठा राजकीय व आर्थिक आधार नसताना 50 वर्षे टिकून राहून सातत्याने वृद्धिंगत होत असलेल्या संस्था अभावानेच आढळतात.50 वर्षं आपला मूळ वारसा व गुणवत्ता टिकवने किंबहुना आपल्या कार्यक्षेत्राची व संस्थेची वाढ़ करत राहणे हे अतिशय कठीण व्रत आहे. संस्था चालवत असलेल्या प्रत्येक पिढीला आपल्या पेक्षाही अधिक कर्तृत्वान आणि दूरदृष्टीची पुढची पिढी तयार करावी लागते.
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या ऍड. बन्सीधर हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची यशस्वी घोडदौड झाली त्यांनी लावलेल्या या रोपट्याचे आज त्यांचे चिरंजीव किशोर नाना हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्था आज 50 व्या सुवर्ण वर्षांत पदार्पण करत आहे. संस्थेच्या वृक्षाचा हा पसारा आज वाढला खरा परंतु या संस्थारुपी वृक्षाला खरी बहार आली ती किशोर नाना यांनी संस्था कारभार हाती घेतल्या नंतरच असं म्हणले तरी ते आज वावगं ठरणार नाही. आज संस्थेत कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी ते पदव्युत्तर महाविद्यालय, विविध व्यावसायिक कोर्सेस, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेंटर व पिंपळेश्वर इंग्रजी माध्यमाची शाळा या सर्वात विध्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत.शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत आज ही या महाविद्यालयांचे नाव तालुक्यात एक नंबर वर घेतले जाते.या वर्षी नानांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ऍड. बी. डी. हंबर्डे विधी महाविद्यालयाची सुरवात केली आहे त्याद्वारे ग्रामीण भागातील मुलांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आता कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. कॉम्पुटर कोर्स असलेला बी सी ए बरोबरच या वर्षी बी सी एस हा नवीन कोर्स सुरु झाला आहे गुरकुल सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा पुढील शैक्षणिक वर्षांपासून सूरू होत आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे मागच्या वर्षीचं किशोर नानांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाला नॅक चा अ ग्रेड मिळाला आहे. या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण सुरु करण्यासाठी 415 पैकी 15 महाविद्यालयाची निवड विद्यापीठानीं केली होती त्यात बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाचे नाव क्रमांक एक वर होते.
सर्व शाखेच्या विदार्थ्यांना ज्ञान मिळवताना दर्जेदार पुस्तकं वाचण्यासाठी सर्वं सोयीनीं युक्त असें आधुनिक ग्रंथालय महाविद्यालय परिसरात सुरु आहे ज्यात किमान तीस हजार पुस्तकं उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी जिम व दोन मोठे क्रिडांगण तयार केले आहेत.सगळीकडे बंद असलेले वार्षिक स्नेह संमेलन मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नानांनी परत एकदा सुरु केले आहे.राज्यस्तरीय वक्तृत्व व कवी संमेलन प्रत्यक वर्षी कॅम्पस मध्ये भरवले जाते.सामाजिक कार्यात तर महाविद्यालयाचा नेहमीच सहभाग राहिला आहे.कायम अवर्षनग्रस्त असलेल्या आष्टी तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असते त्यावर कायमची मात करण्यासाठी नानांनी महाविद्यालयात वापरासाठी लागणाऱ्या दैनंदिन पाण्यासाठी शेततळ बांधण्याचा अभिनव प्रयोग केला आहे रेन हार्वेस्टिंग द्वारे लाखो लिटर पाण्याची साठवण त्यात दरवर्षी होते. महाविद्यालयात शेततळे असणे हा प्रयोग कदाचित महाराष्ट्रात एकमेवद्वितीय असावा.या वर्षीच मुबंई च्या ग्रीन सोलुशन संस्थेचा मानाचा ग्रीन ऍम्बसडर अवॉर्ड कॅम्पस मध्ये असेलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे महाविद्यालयाला मिळाला आहे.कासेवाडी या गावात एन. एस. एस.विभाग मार्फत पाणी आडवा पाणी जिरवा याचे डोंगराळ भागातील पाच वर्षाचे काम उल्लेखनीय ठरले त्यात गावचा ही सहभाग असल्यामुळे पाणी फाउंडेशन चा पुरस्कार गावाला मिळाला.संस्थेचे आजपर्यंत चे सर्वं सरकारी, सेवाभावी संस्थांचे सहा ऑडिट चांगले मानाकंन मिळवून पूर्ण झालेले आहेत.खर तर 50 व्या वर्षीच संस्थेने कात टाकून तारुण्यात पदार्पण केले आहे असं म्हणणं योग्य ठरेल अजूनही येणाऱ्या काळात अनेक नवीन शैक्षणिक कोर्सेस सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे.
आज संस्थेचे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्षं महाविद्यालयात बरेच उपक्रम घेऊन साजरे होत आहे त्याचाच एक भाग म्हणून 19 ऑगस्ट या दिवशी मागील 50 वर्षांत शिक्षण घेतलेल्या 1972 ते 2022 या कालावधीतील आजी माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा एकत्रित स्नेहमीलन मेळावा आयोजित केला आहे.
ज्या महाविद्यालयात आपण शिक्षण घेऊन घडलो तेथील आपल्या जुन्या आठवणी परत एकदा जाग्या करण्यासाठी महाविद्यालयाला परत भेट देण्याचा दुग्धशर्करा योग या निमित्ताने सर्वं विध्यार्थ्यांना घडतो आहे तरी या कार्यक्रमासाठी 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने माजी विध्यार्थ्यांनीं उपस्थित राहवे असें आवाहन अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल काका मेहेर संचालक रत्नमाला आक्का हंबर्डे, प्रा.विश्वनाथ शिंदे, बाबासाहेब घोडके, डॉ. गणेश पिसाळ,डॉ. प्रताप गायकवाड, बाळासाहेब वर्धमाने, सुभान पठाण, प्रा. महेश चौरे, तय्यब शेख, प्राचार्य सोपान निंबोरे, मुख्याध्यापक भाग्यश्री पवार व संस्थेच्या सर्वं कर्मचारी वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.


stay connected