मोकाट जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या
कडा प्रतिनिधी / अनिल मोरे : येथील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या जनावरांमुळे अपघाताला निमंत्रण मिळते. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ते नगर-बीड या मुख्य रस्त्यावरील डॉ. आंबेडकर चौक ते बसस्थानक या वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढलेला मुक्तसंचार धोकादायक ठरु लागला असल्यामुळे नेहमी वर्दळ असते. तसेच परिसरात शाळा, महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थी, वाहनचालकांना रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करतात.
या अगोदर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांना नोटिसा दिलेल्या आहेत. तरी देखील ते दुर्लक्ष करीत असतील, तर पुन्हा नोटीस देऊन ग्रामपंचायत स्तरावर योग्य कारवाई करू. रस्त्यावरुन जीव मुठीत धरुनच चालावे आहे. रस्त्यावरील जनावरांमुळे अनेकदा अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याचा घटनाही घडल्या आहेत.
- आबासाहेब खिलारे, ग्रामसेवक, कडा
मोकाट जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांकडून होत आहे. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.



stay connected