आईच्या स्मृती जपण्यासाठी मुलांनी उभारले आईचे मंदिर

आईच्या स्मृती जपण्यासाठी मुलांनी उभारले आईचे मंदिर



Tejwarta - आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती. आई म्हणजे प्रेमाचे प्रतिक. आई म्हणजेच सर्वस्व अशा आपल्या जन्मदात्या आईच्या स्मृती जपण्यासाठी बीड जिल्ह्यातील खाडे बंधूंनी पुढाकार घेत आईचे मंदिर उभारले आहे. सध्या या मंदिराची चर्चा जोरदार होते आहे. 


राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचे मागील वर्षी 18 मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबांला मोठा धक्का बसला. या कुटुंबात त्यांचे पती शंकर खाडे यांच्यासह तीन मुलं विष्णू, राजेंद्र, छगन आणि विवाहित मुलगी आशा असे त्यांचे कुटुंब आहे. राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत आईची स्मृती कायम असाव्यात असे काहीतरी करू, असा विचार करून घरासमोरील जागेत आईचे मंदिर बांधण्याचा निश्चय केला. केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले. दहा बाय १३ च्या जागेत या मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले. सहा महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक असे सजीव वाटावी अशी मूर्ती बसवण्याचे ठरवले. मूर्तिकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील कातोरे या मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितल्यानंतर ते देखील ही मूर्ती बनवण्यास तयार झाले.





तब्बल चार ते पाच महिने मूर्तीवर काम करून त्यांनी अतिशय आकर्षक आणि बघताक्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली. या मंदिरासाठी आणि मूर्तीसाठी सर्व मिळून तब्बल सात लक्ष रुपये खर्च आला आहे.


दिनांक 18 मे 2022 रोजी राधाबाई खाडे यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुलांनी राजेंद्र विष्णू आणि छगन यांनी एक वर्षाच्या आत आपल्या आईचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. आईचे पंचक्रोशीतील हे एकमेव भव्य असे मंदिर आहे.


आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व असते जगातील कोणताही देव किंवा व्यक्ती ही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. सर्वात मोठे दैवत आई मध्येच सामावलेले आहे. असे नेहमीच बोलले जाते. मात्र खाडे कुटुंबांनी या सर्व गोष्टी सत्यात उतरवून एक आदर्श निर्माण केला आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.