सोशल मीडिया मोक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं 'साथ जिएंगे साथ मरेंगे'च्या कसमे वादेकडे पालकांचं दुर्लक्ष

 सोशल मीडिया मोक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
'साथ जिएंगे साथ मरेंगे'च्या कसमे वादेकडे पालकांचं दुर्लक्ष




       तारुण्याच्या दिशेने झुकणारं वय म्हणजे सोळावं वर्ष! सोळा ते बावीस-तेवीस वय हे तरुण-तरुणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरुण-तरुणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात. एका बाजूला अभ्यासाचा ताण व दुसरीकडे 'तो' तिच्या व 'ती' त्याच्या आठवणीत रात्र जागून काढत असते. या वयात जे काही होतं ते तरुण-तरुणींनी अनुकरणातून शिकलेले असतात. कारण त्यांना या गोष्टीचा फारसा अनुभव आलेला नसतो. तारुण्याची पहिली पायरी समजणा-या सोळाव्या वर्षात स्वत:ला जेवढे जपावं तेवढे कमी असते. या वयातच तरुण-तरुणी अधिक घसरतात. ज्याला सावरता आले त्याचेच करिअर उज्ज्वल होते. नाही तर 'घडीचे घड्याळ' व्हायला वेळ लागत नाही.
       घाई गडबडीत घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापाशिवाय काहीच देत नाही. सोळाव्या वयात 'तो' तिच्या व 'ती' त्याच्याकडे पाहणे स्वाभाविक आहे. परंतु यात स्वत:चा तोल सांभाळणे अधिक महत्त्वाचे असते. स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मात्र ती स्वप्न पाहण्याचाही एक काळ असतो याचे भान तरुण-तरुणींनी ठेवले पाहिजे. या वयात घेतलेले निर्णय सहसा चुकीच्या मार्गाने जाणारे असतात.
त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करावा लागतो. एका बाजूला करिअर तर दुस-या बाजूला 'प्रेम' अशी 'द्विधा अवस्था' कमी वयात डोके दुखी होऊन बसते. एका बाजूला 'आड तर दुस-या बाजूला विहीर' अशी अवस्था निर्माण झाल्याने तरुण-तरुणी घरच्यांच्या नकळत अभ्यासाच्या काळात 'प्रेमाचे रंग' उधळत असतात.
       यातून काही अनैतिक घडल्यास आता पुढे काय? हा प्रश्न तरुण-तरुणींना भंडावून सोडतो. आपलं गुपीत घरच्यांना कळले तर काय होईल? अशा दडपणामुळे तरुण-तरुणींमध्ये वैफल्य निर्माण होते. त्यामुळे समाजात मनोरुग्णांची संख्या सतत वाढत आहे. प्रेम' करणे चुकीची गोष्ट नाही. परंतु स्वत:च्या पायावर उभे राहून केवळ 'प्रेम' करायचे नाही तर ते शेवटपर्यंत निभवायचे असते. कारण प्रेम करणे सोपे आहे, मात्र ते निभावणे कठीण... व्यक्तीला प्रत्येक वयात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे घाईत घेतलेला निर्णय भविष्याची डोके दुखी होता कामा नये. त्यामुळे सोळाव्या वर्षात तोलून मापून पाऊल उचलले पाहिजे.
       सोळाव्या वर्षी कशाप्रकारे काळजी घ्यायला पाहिजे? सोशल मीडियाच्या चक्रव्युहात गुरफटून न जाता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायला पाहिजे. कारण शिक्षणच आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडेल. लोकांच्या सांगण्यावर जाऊ नये आणि निर्णय घेताना विवेक बुध्दीचा वापर करायला पाहिजे. काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्रांचा सल्ला घ्यायला पाहिजे. ना की चुकीच्या मार्गाने लावणा-या मित्रांचा... आपले चुकीच्या दिशेने पडणारे एक पाऊल ही कुटुंबासाठी नुकसानदायी ठरू शकते. तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या दिशेने पडणारे पाऊल भविष्य उध्दवस्त करू शकते. आपल्या मनातील गोष्ट आई-वडीलांसोबत शेअर करायला पाहिजे, त्याने तुमचे मन हलके होईल व अभ्यासात मन रमेल. 


       हार्मोन्स बदलामुळे सोळाव्या वर्षापासून मुलींमध्ये शारीरिक बदल घडायला लागते. या बदलांमुळेच वयात आलेल्या मुली आकर्षित होतात. मग याचा फायदा अनेक जण घ्यायला लागतात. शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून आपलं सर्वस्व अर्पण करायला मुली तयार होतात. यातूनच 'साथ जिएंगे साथ मरेंगे' या कसमे वादेच्या परिपूर्णतेसाठी ब-याचदा जन्मदात्या आई-वडिलांना कुठलीही भनक न लागू देता मुली घरून बेपत्ता होतात. मुला-मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नंतर मात्र त्यांची अवस्था 'धोबी का कुत्ता घर का ना घाट का' यासारखी अतिशय बिकट बनते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. ब-याच कुटुंबात वा समाजात या भीतीतून मुलींचे बालविवाह लावण्याचा प्रकारही सुरु आहे.
       जिल्ह्यात दीड वर्षात ३१४ मुली घरून पळून गेल्या. त्यापैकी ७७ मुलींना परत आणण्यात आले. तर १८ वर्षावरील १ हजार ६५ मुली अर्थात महिला पळून गेल्या आहेत. त्यांचाही शोध घेण्यात येत आहेत. एकंदरीत आधुनिक जीवनशैली, मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडिया यामुळे सहज जवळ येणे शक्य आहे. ही जवळीकताच वयात येणा-या मुलींसाठी धोकादायक ठरत आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या काही महिलांनीसुद्धा चक्क आपल्या मुलाबाळांना सोडून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आहेत. अशा महिलांमुळे त्यांच्या पतींच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नीचा शोध घेऊन तिला परत आणण्याची आर्जव विनवणी महिलांचे पती करत आहेत. 
       सोशल मीडियामुळे जवळीक वाढत आहेत. मोबाईलचा अतिवापर आणि पालकांच्या व्यस्ततेमुळे होत असलेले दुर्लक्ष अनेक प्रकरणात कारणीभूत असल्याचे दिसत आहेत. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, तरच या समस्येवर आळा बसू शकेल. पालकांनी मुलांना समजून घेण्याची गरज आहे. मुलामुलींशी मैत्रीपूर्ण वागून त्यांच्यासोबत नियमित संवाद ठेवणे, चर्चा करणे गरजेचं आहे.  यासोबतच मुलांचे मित्र कोण? त्यांचा ग्रुप कोणता? याचीही माहिती ठेवणे अत्यावश्यक आहे. मुलींमध्ये हार्मोन बदलामुळे आकर्षण निर्माण होते. तर ते प्रेम नसून केवळ शारीरिक आकर्षण आहे, याची समज देऊन त्यांना चांगल्याप्रकारे समजावून सांगण्याची नितांत गरज आहे. मोकळीकतेच्या नावाखाली मुलामुलींकडे दुर्लक्ष करू नये.

          

            शब्दस्पर्शी
    कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.