Ashti - पशुपालक भयभित , पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ !
आष्टी ( प्रतिनिधी ) -
सतत संकटांचा सामना करत असलेला बळीराजा नेहमीच अडचणीत आहे . अवकाळी पावसाने झोडपून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच शेतकऱ्यांविषयी चे सरकारचे उदासिन धोरणाने शेतकरी हैरान झालेला असताना शेतकऱ्यांसमोर पशुधन वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे . घरफोड्या दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा पशुधन चोरीकडे वळविला आहे. दिवसा ढवळ्या व रात्रीही दावणीच्या जनावरांच्या चोरीच्या घटना होऊ लागल्याने शेतकऱ्यांनो सावधान , असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात मागील काही महिन्यापूर्वी पासून पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी गस्तीच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन सुरु करणे गरजेचे आहे . चोरट्यांनी दावणीला बांधलेल्या विदेशी गायी, बैलजोडी यासह बोकड व शेळ्यांची चोरी वाढली असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. आष्टी व अंभोरा ठाणे हद्दीतून दोन बैल व दोन विदेशी गायी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यापुर्वीही अनेक शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत .
१४ एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान पारगाव जोगेश्वरी येथील संदीप खंडू भोसले यांच्या मालकीच्या दोन विदेशी गायी चोरीला गेल्या. २० रोजी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. २२ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास धानोरा येथील ज्ञानदेव साहेबराव शेळके यांचे दोन बैल खुंटेफळ फाट्याजवळील खडकपट्टी शेतातून चोरीला गेले. अज्ञात चोरट्यांविरुद्ध २३ रोजी अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मध्यंतरी लोणी , चोभा निमगाव परिसरातुनही शेळ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत शेतवस्तीवर पशुधन पाळणे शेतकर्याना जिकरीचे वाटत आहे . या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे .
stay connected