गडकिल्ल्यांच्यासह छत्रपतींच्या नावांचा वापर कराल..!.. तर याद राखा - सुरेश पाटोळे.
बीड (प्रतिनिधी)
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या असीम त्यागाचे नि पराक्रमाचे तमाम भारतीयांना आदर असून ते सर्वांचे दैवत आहेत. आमच्या दैवतांच्या नावाचा कोणी गैरवापर करून काळे धंदे करून पैसे कमावत असेल तर त्याला शिव संघर्ष ग्रुपचे मावळे जशाच तसे उत्तर देतील अशा इशारा शिव संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी शिवमावळे सुरेश पाटोळे यांनी दिला आहे.
छत्रपती राजे आणि ताठ मानेने उभे असलेले, हजारो मर्द मावळ्यांनी आपल्या रक्ताचे शिंपण करून स्वराज्याची शान वाढविलेले गडकोट किल्ले आज अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता नि गौरव झालेले आहेत. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सर्वधर्मीय सैनिकांच्या पराक्रमाचे जिवंत स्मारक झालेले गड किल्ल्यांचे संवर्धन करणे आणि त्यांच्या नावाचे पावित्र्य राखणे हे आपल्या प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्रात छत्रपतींच्या आणि गड किल्ल्यांच्या नावाने कोणी हॉटेल, बियरबार आणि धाबे चालवून आमच्या दैवतांचा व गड किल्ल्यांचा कोणी अपमान करत असेल तर महराष्ट्रातील शिव संघर्ष ग्रुपचे मावळे त्यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. भविष्यातील होणाऱ्या परिणामास सर्वस्वी स्वतः जबाबदार असतील अशी माहिती शिव संघर्ष ग्रुपचे मावळे सुरेश पाटोळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गड-किल्ल्यांच्या व छत्रपतींच्या नावाने असलेल्या बियरबार, हॉटेल्स किंवा धाब्यावर कोणीही दारू पिऊन धिंगाणा करणार नाही किंवा हिडीस गाण्यांवर नाचगाणी करणार नाही याची दक्षता स्वतः हॉटेल मालकाबरोबर पोलीस प्रशासनाने घ्यावी. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच गड-किल्ले भारतीयांचे वैभव आहे. ह्याचे सर्व नागरिकांनी भान ठेवावे. गड किल्ल्यासह छत्रपतींच्या नावाचा वापर करून हॉटेल,धाबा चालवून कोणी फडतूस प्रकार करताना आढळल्यास शिव संघर्ष ग्रुप चे मावळे अश्या संस्कृती भक्षकांना चांगला धडा शिकवून नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील, असा जाहीर इशारा शिव संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी दिला आहे.
सुरेश पाटोळे यांनी पोलीस प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकारी, यांनी सुद्धा हॉटेल, बियरबार धाबा यांना परवाना देताना छत्रपती व गड किल्ल्यांच्या नावांचा कोणी वापर तर करत नाही यांची खात्री करूनच परवाना देण्यात यावा. छत्रपतींच्या व गड-किल्ल्यांच्या नावाचा कोणी वापर करून आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनैतिक काळे धंदे करून वातावरण दुषित करणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध लावावेत. परिसरात ३१ डिसेंबर वा इतर कोणत्याही दिवशी दारू पिऊन आनंद साजरा करत असेल तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी. अशी विनंतीही सुरेश पाटोळे यांनी केली आहे.
stay connected