सन 2021-22 च्या हंगामात गाळपाअभावी राहणाऱ्या ऊसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.
*****************************
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांची मागणी
*****************************
अंबाजोगाई- देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे सरकारने दोन साखर व इथेनॉल कारखान्यामध्ये 25 किलोमीटर हवाई अंतराची अट लावल्याने शेतकऱ्यांना नवीन साखर कारखाने काढता आले नाहीत.परिणामी सन 2021-22 च्या हंगामात गाळपाअभावी ऊस शिल्लक राहणार आहे.याची जबाबदारी स्वीकारून आपत्ती निवारण कायद्यान्वये शिल्लक ऊसासाठी प्रति एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.
सन 2013 साली पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ऊस आंदोलन केले. पृथ्वीराज चव्हाण सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला.सांगली जिल्ह्यातील चंद्रकांत नलावडे आणि पुण्यातील कुंडलिक कोकाटे हे तरुण शेतकरी गोळीबारात ठार मारले. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन साखर धंद्यातील अकार्यक्षमता,अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी डॉ.मनमोहन सिंग सरकारने रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ.सी. रंगराजन यांची समिती नेमली.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या समवेत डॉ.सी.रंगराजन यांनी दिल्ली, कानपूर,मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, कोलकता येथे बैठका घेतल्या. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकावी,साखर कारखान्याच्या महसुली उत्पन्नातील 70% हिस्सा शेतकऱ्यांना ऊसाचा भाव म्हणून देण्यात यावा. अशा महत्त्वपूर्ण शिफारसी डॉ.सी. रंगराजन समितीने केल्या.दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय भ्रष्ट साखर सम्राटांनी या शिफारशींची अंमलबजावणी होवू दिली नाही.
शेतकऱ्यांनी एकरी 100 टनांपर्यंत ऊस उत्पादनाचे लक्ष गाठल्याने ऊस उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे.देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे सरकारने नवीन साखर आणि इथेनॉल कारखाने उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट घातल्याने मागिल 10 वर्षात नवीन साखर कारखाने उभारले नाहीत.त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या आपत्तीची जबाबदारी उध्दव ठाकरे सरकारची आहे. तेंव्हा आपत्ती निवारण कायद्याचा वापर करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी केली आहे.
******************************
stay connected