ठाणे ग्रामीण कोरोनामुक्त...
ग्रामीण भागातील रुग्नसंख्या शून्यावर...!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.१ ठाणे : जिल्हा परिषद क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. ठाणे ग्रामीण भागात ३० मार्चपासून एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ही माहिती दिली. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या संकटामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मार्च २०२० पासून कोरोना प्रतिबंधक उपायोजनामुळे सर्वत्र निर्बंध घालण्यात आले होते. आज दोन वर्षानंतर ठाणे ग्रामीणमधील कोरोना बाधितांचा आकडा शून्यावर आला असून ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्याही शून्यावर आली आहे.
कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विविध खबरदारीच्या उपाययोजना म्हणून चाचणी, सर्वेक्षण, स्वच्छता, उपचार, लसीकरण, आरोग्य शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या उपाययोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी, महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस त्याचबरोबर शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली.
ठाणे ग्रामीणमधील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४९ हजार ३०८ रुग्णाची नोंद झाली. यापैकी ४७ हजार ९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर दुर्दैवाने १२५४ रुग्णाचा मृत्यू झाला.
११ लाख नागरिकांचे लसीकरण
ठाणे ग्रामीणमधील आतापर्यंत ११ लाख ३५ हजार १३२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये ९ लाख ४० हजार ७७ जणांचा पहिला तर ६ लाख ७२ हजार ९८जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर ५ हजार ५०८ नागरिकांनी बुस्टर घेतला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
जनजागृतीतून कोरोनामुक्ती
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी माहिती, शिक्षण, संवाद या त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. यासाठी डिजिटल माध्यमांसह पारंपारिक प्रसार आणि प्रचार माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात आला. त्याचबरोबर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नातून नागरिकांना कोरोना नियंत्रण नियमावलीचे पालन करण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यात आले.
stay connected