हरित क्रांतीनंतर आता धवलक्रांतीकडे आष्टीची वाटचाल; आ. सुरेश धस यांचा दूरदृष्टीचा उपक्रम
आष्टी | प्रतिनिधी
एकेकाळी कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी मतदारसंघाचे चित्र आता वेगाने बदलत असल्याचे दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासोबतच जलसंधारणाच्या विविध योजनांवर भर देत आ. सुरेश धस यांनी गेल्या काही वर्षांत मतदारसंघात विकासाची नवी दिशा दिली आहे. आता या जलक्रांतीनंतर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धवलक्रांतीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
मतदारसंघातील अनेक लहान-मोठे तलाव गाळमुक्त करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरावा, भूजल पातळीत वाढ व्हावी आणि भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय व्हावा, या उद्देशाने विविध जलसंधारण प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे अनेक भागांतील विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.
यासोबतच शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारा खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आष्टी तालुक्यातील सुमारे ८० टक्क्यांहून अधिक शेतीक्षेत्र ओलिताखाली येण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.
केवळ सिंचन व्यवस्था निर्माण करून थांबण्याऐवजी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ व्हावी, यासाठी आ. सुरेश धस यांनी आता दूध व्यवसायाला जोडधंदा म्हणून प्रोत्साहन देण्याचा निर्धार केला आहे. शेतीसोबत दुग्धव्यवसाय केल्यास शेतकऱ्यांना नियमित आर्थिक उत्पन्न मिळू शकते, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत होऊ शकते आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, या भूमिकेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आष्टी तालुका दूध संघाच्या माध्यमातून राज्यासह देशातील दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश मिळविलेल्या नामांकित तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी आणि अनुभवी दूध उद्योजकांना आष्टी येथे आमंत्रित करून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये आधुनिक दुग्धव्यवसाय, उच्च दूध उत्पादन देणाऱ्या गाईंचे व्यवस्थापन, पशुपालनातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, मुरघास निर्मिती, पशुखाद्य नियोजन, रोग व्यवस्थापन, बाजारपेठ आणि दुग्ध व्यवसायातील नवनवीन संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
आष्टी मतदारसंघात जलसंधारणातून शेतीला बळ देण्याबरोबरच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा हा प्रयत्न भविष्यात ग्रामीण विकासासाठी नवा आदर्श ठरू शकतो. "जलक्रांतीतून हरित क्रांती आणि हरित क्रांतीतून धवलक्रांती" हा विकासाचा नवा मंत्र प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आ. सुरेश धस प्रयत्नशील असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होत आहे. अशा सर्वसमावेशक नियोजनामुळे आष्टी मतदारसंघाची ओळख केवळ दुष्काळी तालुका म्हणून नव्हे, तर जलसंपन्न, कृषिसंपन्न आणि दुग्धसमृद्ध तालुका म्हणून निर्माण होण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.


stay connected