म्हसोबाची वाडी येथे गणेश कृषी सेवा केंद्राचा शुभारंभ; शेतकऱ्यांना आता गावातच मिळणार कृषी साहित्य
आष्टी, प्रतिनिधी (राजू गायकवाड) : आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व कृषी औषधे खरेदीसाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. ही गैरसोय लक्षात घेऊन शेतकरी हिताच्या दृष्टीने आज दि. २ जून २०२६ (मंगळवार) रोजी म्हसोबाची वाडी चौकात गणेश कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या शुभारंभामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कृषी सेवा केंद्राची स्थापना युवा उद्योजक कृष्णा आजीनाथ शेकडे (सर) यांनी केली आहे. केंद्रामध्ये विविध नामांकित कंपन्यांची दर्जेदार बी-बियाणे, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच पीक संरक्षणासाठी आवश्यक कृषी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य आता स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणार आहे.
शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी कृष्णा शेकडे यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी अनेक शेतकरी, ग्रामस्थ व कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासह दर्जेदार कृषी साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कृष्णा शेकडे यांनी सांगितले.
गणेश कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी आवश्यक कृषी साहित्य उपलब्ध होणार असल्याने परिसरातील शेती विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शेती उत्पादन वाढीसाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हे केंद्र भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



stay connected