वाळुंज येथे प्राजक्ताताई धस यांच्या उपस्थितीत भव्य बालसाहित्य संमेलन ********************** मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ग्रामस्थांकडून आवाहन

 वाळुंज येथे प्राजक्ताताई धस यांच्या उपस्थितीत भव्य बालसाहित्य संमेलन
**********************
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ग्रामस्थांकडून आवाहन

*******************************



******************************

आष्टी (प्रतिनिधी) 


यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन २०२५’ अंतर्गत, २३ मार्च २०२६ रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे एका भव्य एकदिवसीय बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन : एक वाङ्मयीन चळवळ’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन ‘आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत’ ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या सोहळ्याच्या स्वागताध्यक्षपदी महानंद, मुंबईच्या संचालिका सौ. प्राजक्ताताई सुरेशअण्णा धस असून, संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. योगेश कुदळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सकाळी ९:३० वाजता निघणाऱ्या उत्साही ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यामध्ये बालकवींचे कवीसंमेलन, बालसाहित्यिकांचे कथाकथन, अभ्यासक्रमातील साहित्यिकांच्या मुलाखती, तसेच निमंत्रित साहित्यिकांचे मार्गदर्शन व काव्य सादरीकरण असे विविध उपक्रम पार पडतील.

संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणून ‘ओळख कवितेची’ ही नाटिका आणि ‘आम्ही शिवकन्या’ या गीताचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी कवी हनुमंत चांदगुडे, शंकर कसबे, सय्यद अल्लाउद्दीन, कथाकार वि. भा. साळुंके, सोमनाथ वाळके यांच्यासह शिक्षण व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाचे संयोजक व फेलोशिपचे मानकरी डॉ. हरिश्चंद्र नवनाथ हातवटे यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या साहित्य सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.