सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी
शिरुरकर साहित्यप्रेमींना उत्सुकता; स्वागतासाठी भास्कर चंदनशीव साहित्य नगरी सज्ज
शिरुर कासार, दि. १४ (प्रतिनिधी):
जिल्हास्तरीय सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन दि.१६ ते १७ डिसेंबर रोजी शिरुर कासार येथील एकलव्य विद्यालय, भास्कर चंदनशीव साहित्यनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष अमर हबीब, आमदार सुरेश धस यांचे प्रमुख उपस्थितीत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होत आहे. संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून साहित्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमलनास शनिवारी भव्य ग्रंथ दिंडीने प्रारंभ होईल. सकाळी जिजामाता चौक ते भास्कर चंदनशीव साहित्यनगरी अशा भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडीमध्ये शेतकरी, वारकरी, कवी, लेखक, कलावंत, विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. पुणे येथील मॉडर्न एज्यूकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई सदस्य प्रसिद्ध कवी दासू वैद्य आणि डॉ. राजेश गायकवाड, प्राचार्य दीपाताई क्षीरसागर, भास्कर बडे, दगडू लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने सकाळी प्रारंभ होईल.
पाठ्यपुस्तकातील कवी डॉ. कैलास दौंड यांची मुलाखत कवी लक्ष्मण खेडकर आणि सुर्यकांत नेटके घेतील. दुपारच्या सत्रात ‘शेतीचे प्रश्न, सरकारी धोरण आणि मराठी लेखक’ या विषयावर मसापचे डॉ. दादा गोरे यांचे अध्यक्षतेत डॉ. गणेश मोहिते छ. संभाजीनगर, कालिदास आपेट, रमेश जाधव पुणे, जगन्नाथ कदम, डॉ .सोपान सुरवसे यांच्या सहभागाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तालुक्यातील पाच शेतकर्यांना सिंदफणा गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे. कथाकार प्रकाश भूते यांच्या अध्यक्षतेत दुपारच्या सत्रात कथाकथन कार्यक्रमामध्ये भास्कर बडे, कविता सोनटक्के, गोरख शेंद्रे, ल.कि.दिवटे, आशोक नजान यांचा सहभाग राहील. नेहमी प्रमाणे जिल्हास्तरीय सातव्या मराठी साहित्य संमेलनाची शिरुरकासार तालुक्यातील साहित्यप्रेमी, नागरिकांमध्ये उत्साह आहे. संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरामध्ये जागोजागी कमानी उभारण्यात आल्या आहेत. नेत्रदिपक अशा रांगोळींनी स्वागतासाठी संमेलनस्थळ सज्ज झाले आहे. त्याचबरोबर शासकीय ग्रंथविक्री, चित्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन यासाठी दालन निर्मितीही करण्यात आली आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सिंदफणा सेवाभावी संस्थेच्या वतीने हे संमेलन एकलव्य विद्यालयात होत असून ग्रंथखरेदीसह साहित्य संमेलनाची शिरुरकरांना उत्सुकता आहे.


.jpg)


stay connected