धानोरा : शेतकऱ्यांच्या दारात तंत्रज्ञान – ‘महाविस्तार एआय ॲप’ डाऊनलोडसाठी कृषी विभागाची विशेष मोहिम
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेती उत्पादनातील विविध प्रश्नांची वेगवान सोडवणूक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘महाविस्तार एआय ॲप’ सादर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन, कीड-रोग निदान, पिक व्यवस्थापन, हवामान अंदाज, बाजारभाव यांसारखी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे ॲप विकसित केले असून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.
त्याच मोहिमेचा भाग म्हणून मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी धानोरा येथे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्रत्यक्ष ॲप डाऊनलोड करून देण्याची उपक्रमशील मोहीम राबवली.
पहिला उपक्रम सकाळी 9 वाजता जनता विद्यालय, धानोरा येथे घेण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ग्रामपंचायत धानोरा (आठवडी बाजार) येथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांना ॲपची माहिती देत, त्याचे फायदे समजावत आणि त्यांच्या मोबाईलवर तात्काळ डाउनलोड करून देत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून
प्रमोद खुटाळे – मंडलाधिकारी,
अनभुले मॅडम – सहायक कृषी अधिकारी,
चाकणे साहेब – उपकृषी अधिकारी,
अंकुश चव्हाण – मा .सभापती,
सुभाष शेळके – सरपंच,
सय्यद खालेद - मा . सदस्य
तसेच यावेळी उप कृषी अधिकारी अमोल राऊत ,सहाय्यक कृषी अधिकारी दिगंबर कुलकर्णी, जाधव साहेब, मंदा खराडे, कचरे मॅडम ,आशा गोरे ,संदीप सुंबे ,शिवाजी सुंबे, अतुल वस्तरे या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅम्पेन स्वरूपात मोहीम राबविली व आठवडी बाजाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतून आलेल्या शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतला व हे ॲप डाऊनलोड करून घेतले
तसेच कृषी विभागाचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, बदलत्या हवामानामुळे आणि नव्या तांत्रिक आव्हानांमुळे शेती पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. एआय आधारित महाविस्तार ॲपच्या मदतीने शेतकरी वैज्ञानिक मार्गदर्शनासोबतच त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण मिळवू शकणार आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना या ॲपचा अधिकाधिक वापर करून शेती उत्पादनात वाढ, खर्चात बचत आणि तंत्रज्ञान आधारित शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
या मोहिमेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून कृषी विभागाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविस्तार एआय ॲपमुळे आता बळीराजा अधिक सक्षम, अपडेटेड आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध होण्याचा मार्ग खुला होणार आहे.




stay connected