कृतज्ञ स्मरण –"जनता शिक्षणसंस्थेची मातृसावली,साधेपणाची सुवर्णछाया"
कै. कावेरीबाई धोंडीराम बांदल (बाई)
जनता वस्तीगृह संचलित जनता परिवार परिसरातील प्रत्येक कुटुंब आज एका तेजस्वी, पण नितांत साध्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीपुढे नतमस्तक झाले आहे. त्या म्हणजे कावेरीबाई धोंडीराम बांदल— आपल्या सर्वांच्या ‘बाई’.
कैलासवासी धोंडीराम गणपत बांदल दादा यांनी शिक्षणाच्या दिव्यासाठी आयुष्य वाहिले. मात्र त्या दिव्यात तेल ओतणाऱ्या, ज्योत विझू नये म्हणून तिच्यावर हात ठेवणाऱ्या,पाठीशी उभे राहून प्रत्येक स्वप्नाला शक्यतेची वाट दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाई. दादांनी स्वप्न पाहिले— “धानोरा आणि धानोऱ्याच्या आसपासच्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळायला हवा.” हे स्वप्न केवळ त्यांचे नव्हते; ते बाईंचेही होते, अगदी न बोलता, न गाजावाजा करता, शांतपणे जगलेले!
शिक्षणसंस्थेचा पाया रचताना, विटा-विटांमध्ये दादांचे ध्येय जसे मिसळले, तसाच बाईंचा त्याग, संयम आणि मूक पाठिंबा या संकुलात मिसळला. या शैक्षणिक साम्राज्याचा भक्कम पाया जरी दादांनी घातला, तरी त्याला आश्वस्त पाठिंबा दिला तो बाईंच्या निश्चयी नजरेने.
त्या अतिशय साध्या,शब्दांत अभिमान नाही, चेहऱ्यावर मोठेपणाचा थेंबही नाही, परंतु मन मात्र हिमालयाएवढं विशाल! प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी हाच त्यांचा परिचय.
घरातील पाहुणा असो की गावातील कुणी सामान्य व्यक्ती— बाई प्रत्येकाशी मनापासून जोडत. त्यांनी कधीही काही मागितलं नाही, पण दिलं मात्र खूप— वेळ, माया, साथ, आणि दादांच्या स्वप्नासाठी अख्खं आयुष्य!
आज बाई आपल्या मध्ये नाहीत… पण, जेव्हा जनता विद्यालयातील विद्यार्थी प्रार्थना म्हणतात, जेव्हा शिक्षक ज्ञानदान करतात, जेव्हा या संस्थेच्या भिंतींमधून यश, प्रामाणिकपणा आणि संस्कारांचे प्रतिध्वनी गुंजतात— तेव्हा त्या प्रतिध्वनीत बाईंच्या जीवनाची पवित्रता नक्की मिसळेल.
बाई गेल्या, पण त्यांचं स्थान?
ते कोणाच्या घरात नाही, कोणत्या फलकावर नाही…
ते कोरलेले आहे जनता परिवाराच्या अंतःकरणात!
त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी जगलेलं साधेपण आणि त्यांनी जपलेली माणुसकी, हीच त्यांची खरी ‘संपत्ती' आहे— आणि ती आम्ही कधीच गमावू शकत नाही.
बाई,
तुम्ही शरीररूपाने सोडून गेलात, पण तुमची माया, तुमची कर्तव्यनिष्ठा आणि दादांच्या पाठिशी उभं राहण्याची तुमची तळमळ— ही आमची प्रेरणा म्हणून कायम राहील. आज जनता विद्यालयातील प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि जनता परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्या मनातील कृतज्ञ अश्रूंनी तुम्हाला अंतिम प्रणाम करतो.
“काही जण जगतात आयुष्यभर;
आणि काही जण आयुष्याचं अर्थपूर्ण जगणं शिकवून जातात!”
बाई अशाच होत्या.............


stay connected