बिबट्याचा हल्ला! — आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू गावात भीतीचे सावट, पोलिस व वनविभागाचा पुढील तपास सुरू

 बिबट्याचा हल्ला! — आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गावात भीतीचे सावट, पोलिस व वनविभागाचा पुढील तपास सुरू





आष्टी तालुका | दि. १२ ऑक्टोबर रात्री सुमारास बावी (ता. आष्टी) शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रविवारी रात्री शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याचा मृत्यू केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.


मृत तरुणाचे नाव राजू विश्वनाथ गोल्हार (वय ३५, रा. बावी दरेवाडी) असे असून ते नेहमीप्रमाणे रविवारी रात्री सुमारे ९ वाजता आपल्या शेतात गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी चिंतेने शोधमोहीम सुरू केली.


शोध घेत असताना शेताच्या परिसरात टॉवेल व रक्ताचे डाग आढळले. यानंतर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. पुढील शोध घेत असताना काही अंतरावर झुडपात राजू गोल्हार यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर ओरखडे, दातांचे ठसे आणि अंगावरच्या जखमांवरून हा बिबट्याचा हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला.


वनविभागाकडून या भागात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बावी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्याचे आवाहन पोलिस व वनविभागाने केले आहे.


ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्याची तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांत आष्टी तालुक्यात बिबट्याचे वाढते दर्शन आणि प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.


या घटनेने पुन्हा एकदा मानव–वन्यजीव संघर्षाचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.


*दक्षता*🚨🚔👨‍✈️

अंभोरा पोलीस स्टेशन

दिनांक:-13/10/25


*विषय:- दक्षता व सतर्कता - बिबट्यापासून धोका टाळण्याची गुरुकिल्ली!!!*


प्रिय नागरिकांनो,

आष्टी तालुक्यातील मौजे बावी परिसरात मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केला असून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन अंभोरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.


*महत्त्वाच्या सूचना*


1)सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा शेतात किंवा शिवारात एकट्याने जाऊ नका.

2)शेतात काम करताना किंवा पाण्याच्या नाल्याजवळ एकत्रित जा. 

3)जनावरं बांधताना, गायी-म्हशींना रात्री शेतात एकटं सोडू नका.

4)रात्री घराबाहेर किंवा शेतात जाताना टॉर्च घेऊन एकत्रित जाणे.

5) लहान मुलांना डोंगर/टेकडी, झाडी-झूडपी अथवा नदी /नाले/ओढ्याजवळ खेळून देऊ नका.

6)कोणालाही बिबट्या अथवा बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यास किंवा आवाज ऐकू आल्यास ताबडतोब अंभोरा पोलीस स्टेशन किंवा वनविभागाला कळवा.

7) मोबाईलवर, सोशल मीडियावर अफवा पसरवू नका. सत्यता पडताळूनच खात्रीशीर माहितीच शेअर करा.


बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक कार्यरत आहे. कृपया त्यांच्या सूचनांचं पालन करा व त्यांना आवश्यक सहकार्य द्या. कोठेही काही अडचण असल्यास तात्काळ अंभोरा पोलीसांना सपंर्क करा.अंभोरा पोलीस स्टेशन सदैव आपल्या सेवेत तत्पर आहे.


*आपली सुरक्षा आपल्या हातात आहे.सतर्कता हीच सर्वोत्तम सुरक्षा आहे.*🙏


*प्रभारी अधिकारी*

*अंभोरा पोलीस स्टेशन*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.