हवामान बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापरावे
---- आमदार सुरेश धस
**************************
*************************
आष्टी(प्रतिनिधी)
विद्यापीठांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी काम करून पशुधनातील दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरली पाहीजे तसेच पर्यावरणीय असंतुलन, हवामान बदलाकडे लक्ष दिले पाहिजे. नामशेष होणारी पिके, मिलेट लागवड वाढवली हवीत.तसेच हवामानाचा अचुक अंदाज घेवुन तंत्रज्ञानात बदल करून उत्पादन वाढ केली पाहीजे असे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या वतीने प्रक्षेत्र दिवस उडीद व रब्बी पीक व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम (दि23 रोजी)हरिनारायण आष्टा ता. आष्टी येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प. सदस्य अमरराजे निंबाळकर हे होते. प्रमुख पाहुणे गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी - आष्टी, व सागर पठाडे तालुका कृषी अधिकारी - केज हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश धस यांनी केले. व्यासपीठावर गणेश माळवे सरपंच-आष्टा, वैभव पठाडे -उपसरपंच आष्टा तसेच कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी, कृष्णा कर्डिले, प्रमोद रेणापुरकर, डॉ. प्रदीप सांगळे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कर्डिले,शास्त्रज्ञ (पीकविद्या) यांनी केले. कडधान्यवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार- प्रचार व्हावा तसेच मृदा आरोग्य व्यवस्थापनाबरोबर शेतकरी उत्पादन व उत्पन्न वाढावे हा या कार्यक्रमाचा हेतु असल्याचे सांगुण कृषि विज्ञान केंद्राने आष्टी तालुक्यात केलेल्या कामाची माहीतीही त्यांनी दिली. उद्यानविद्या शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी यांनी कांदा लागवडीबाबत माहीती देताना जुन्या वाणाच्या वापराऐवजी नवीन वाण लागवड व बिजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. नवीन संशोधित वाण लागवड तंत्रज्ञान व साठवणुकीतील बदलावर त्यांनी प्रकाश टाकला. कांदा लागवडीची पंचसुत्री शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमात ‘शेतकरी यशोगाथा’ पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच शेतकरी प्रणोम शिंदे व सतीश पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्राने केलेल्या कामामुळे 22 ते 30%. उत्पादन वाढुन खर्च कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटनपर मार्गदर्शनात आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, विद्यापीठांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी काम केले पाहीजे. पशुधनातील दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरली पाहीजे तसेच पर्यावरणीय असंतुलन, हवामान बदलाकडे लक्ष दिले पाहिजे. नामशेष होणारी पिके, मिलेट लागवड वाढवली पाहीजेत. हवामानाचा अचुक अंदाज घेवुन तंत्रज्ञानात बदल करून उत्पादन वाढ केली पाहीजे. पिक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पन्न गृहित धरणार आहेत त्यामुळे नुकसान होताच अर्ज करावेत. कांद्याची साठवण क्षमता वाढवावी म्हणजे दर बदल झाला तरी नुकसान होणार नाही. केंद्राने तयार केलेल्या मिलेट किटचेही त्यांनी कौतुक केले. तसेच विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे नमुद करुन कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कामाचे कौतुक केले.
सागर पठाडे यांनी कांदा चाळीचे प्रस्ताव देण्याबाबत सुचित केले. गोरख तरटे यांनी सेंद्रिय शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. डॉ. प्रदीप सांगळे यांनी कीड-रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. आभार प्रमोद रेणापुरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील 300 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी विविध शेतकरी गट, शेतकरी सतीश पठाडे, प्रणोम शिंदे, गळगटे, भाऊ धोंडे व इतरांनी परिश्रम घेतले.
कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अन्न सुरक्षा व पोषण कार्यक्रम अभियान अंतर्गत समुहप्रथम दर्शनी योजनेच्या माध्यमातुन जामगाव, गांधनवाडी व ह. आष्टा येथील 53 शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात आली.
stay connected