वेव्हज सहकलावंत आणि आशय सामग्री निर्मात्यांसाठी एक शक्तिशाली व्यासपीठ: हिमेश रेशमिया
वेव्हज 2025 परिषदेमध्ये “भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेणे” या शीर्षकाखाली एक महत्वाचे सत्र संपन्न झाले. या सत्रात संगीत उद्योगातील दिग्गज आणि प्रभावी व्यक्तींनी भारतीय संगीताचा जागतिक उदय आणि पुढील संधींवर चर्चा केली.
या प्रभावी सत्रात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत उद्योगातील काही आदरणीय नावांनी एकत्र येऊन कलाकारांचा विकास, संगीत प्रकाशन, डिजिटल वृद्धी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि उद्योगातील नवोन्मेष यावर आपली मते मांडली.
प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांनी वेव्हज 2025 चे एकत्रित काम करणारे कलावंत आणि सामग्री निर्मात्यांसाठी एक शक्तिशाली व्यासपीठ असे वर्णन केले. त्यांनी नवोदितांसाठी तयारीच्या महत्त्वावर जोर दिला आणि त्यांना आपला संगीत पोर्टफोलिओ नेहमी तयार आणि परिपूर्ण ठेवण्याचा सल्ला दिला. आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी संधी मर्यादित होत्या, परंतु आजच्या नवोदित कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठे आणि समाज माध्यमांचा वापर करून आपली प्रतिभा प्रदर्शित करता येते. तथापि, संगीताचा दर्जा हाच सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले - संगीत आकर्षक आणि मधुर असावे जेणेकरून ते प्रेक्षकांशी जोडले जाईल आणि उद्योगात आपली छाप पाडेल, असे ते म्हणाले.
युनिव्हर्सल म्युझिकचे उपाध्यक्ष क्वी टियांग यांनी आशियाई आणि जागतिक संगीत बाजारपेठेच्या बदलत्या गतिशीलतेवर अंतर्दृष्टीपूर्ण मते मांडली. त्यांनी भारतीय प्रतिभांना प्रोत्साहन देण्यास आणि त्यांच्या जागतिक यशासाठी मार्ग निर्माण करण्याच्या युनिव्हर्सल म्युझिकच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, तसेच भारतात अधिक शाश्वत आणि मूल्य-प्रधान संगीतरसिक संस्कृतीची गरज अधोरेखित केली.
संगीत तंत्रज्ञान आणि कॉपीराइट संरक्षणातील अग्रणी, आयएफपीआय (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफिक इंडस्ट्री) चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. रिचर्ड गूच यांनी डेटा-प्रधान धोरणे आणि जागतिक मानकांच्या भूमिकेवर जोर दिला, यामुळे भारतीय संगीताचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर संरक्षण आणि प्रचार होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
जगातल्या सर्वात मोठ्या संगीत प्रसारण संस्थांपैकी एक असलेल्या सोनी म्युझिक पब्लिशिंगचे कार्यकारी अधिकारी दिनराज शेट्टी यांनी संगीत हक्क व्यवस्थापनावर विचार मांडले. भारतीय गीतकार आणि संगीतकार प्रसारण युगात आपल्या निर्मितीद्वारे अधिक चांगला नफा कसा मिळवू शकतात , यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
'सारेगम'चे व्यवस्थापकीय संचालक विक्रम मेहरा यांनी कलाकार आणि संगीत कंपनी यांच्यातील सहजीव संबंधावर भर दिला. ते म्हणाले की, उद्योगाची वाढ सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही बाजूंना सन्मान मिळायला हवा. त्यांनी सांगितले की, कलाकारांच्या सर्जनशीलतेला मूल्य दिले पाहिजे, तर संगीत कंपनीने संगीतावर केलेल्या आर्थिक गुंतवणुकीला मान्यता मिळाली पाहिजे. मेहरा यांनी एक मजबूत सदस्यता-आधारित बाजार, सरकारच्या धोरणांमध्ये सुलभता आणि संगीत उद्योगाला मोठा फटका देणा-या चोरीविरोधी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
वार्नर म्युझिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जय मेहता यांनी भारतीय संगीत उद्योगाच्या भविष्याबद्दलचा आपला दृष्टीकोन सादर केला. देशाचा झपाट्याने वाढणारा जीडीपी आणि त्यातील संगीत क्षेत्राची तुलनेने स्थिर वाढ यामधील विरोधाभासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी सांगितले की, आर्थिक विस्तार झाला पण विशेषत: धननिर्मिती आणि ग्राहक वर्तनाच्या समस्येमुळे संगीत उद्योग अपेक्षित गतीने वाढला नाही. तथापि, मेहता यांनी यावेळी आशावादही व्यक्त केला. ते म्हणाले की, भारतीय ग्राहक फक्त ज्यावेळी सामग्री खरोखरच आकर्षक आणि उच्च-गुणवत्तेची असते, त्याचवेळी पैसे देण्यास तयार असतात. त्यांनी नवीन प्रतिभेचा शोध घेण्याचे महत्त्व तसेच संगीताच्या विविध प्रकारांचा प्रचार करण्याचे आणि भारतीय आणि जागतिक संगीत दृष्यांमध्ये मजबूत बंध निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. याद्वारे उद्योगाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग केला जाऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
धोरण आणि नियामक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व, फर्नांडिस यांनी भारताच्या संगीत उद्योगाचा एक समग्र आर्थिक आढावा सादर केला. त्यांनी मजबूत संरचना, हक्क संरक्षण आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे समर्थन केले.
या संपूर्ण सत्राचे उत्तम संचालन एक सन्माननीय संगीत उद्योजक आणि जागतिक सल्लागार स्कॉट डी मर्काडो यांनी केले. त्यांनी प्रत्येक वक्त्याला त्याचा भिन्न दृष्टिकोन आणि भविष्यासंबंधी चिंतन प्रकट करण्यासाठी सूचक प्रश्न विचारले. त्यांनी कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिकेवर जोर दिला आणि सांगितले की, कलाकार हे उद्योगाचे खरे नायक असल्यामुळे त्यांना समर्थन आणि सामर्थ्य प्राप्त करुन देणारी परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
stay connected