वर्गात एकटाच विद्यार्थी, शिकवायला सात शिक्षक , तरी पठ्ठ्या दहावी फेल !
नैनीताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकमध्ये एक सरकारी शाळा स्थित आहे. नैनीताल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 115 किलोमीटर दूर असलेल्या भद्रकोट गावातील या शाळेत 19 एप्रिल रोजी उत्तराखंड शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. यावेळी या शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत केवळ 7 विद्यार्थी असल्याचे समोर आले. तसेच या शाळेत मुख्याध्यापकांसह एकूण 7 शिक्षक आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या शाळेत इयत्ता 6 वी आणि 7 वी मध्ये प्रत्येकी दोन विद्यार्थी आहेत. तर इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी मध्ये प्रत्येकी एक-एक विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
तर याच शाळेत इयत्ता 10 वी च्या वर्गात एकमेव विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र त्याने बोर्डाच्या सर्वच विषयात अत्यंत खराब गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्याला हिंदी विषयात जेमतेम 10 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि गणित यांसारख्या महत्त्वाच्या विषयात त्याला 10 पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांनी जेव्हा बोर्ड परीक्षेचा निकाल आणि शाळांच्या कामगिरीची तपासणी केली, तेव्हा ही घटना समोर आली.
त्यावेळी त्यांना या शाळेतील आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांविषयी माहिती मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले. जिल्हा मुख्य शिक्षण अधिकारी 5 मे (सोमवार) रोजी स्वतः या प्रकरणाच्या चौकशीसाठी शाळेला भेट देणार आहेत. माध्यमिक शिक्षणाचे अतिरिक्त संचालक जी.एस. सौन यांनीही या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. “या शाळेत पूर्ण कर्मचारी वर्ग असतानाही केवळ एक विद्यार्थी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, ही खरोखरच विचित्र बाब आहे. मी मुख्य शिक्षण अधिकाऱ्याला त्वरित शाळेला भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.” असे माध्यमिक शिक्षणाचे अतिरिक्त संचालक जी.एस. सौन यांनी म्हटले. उत्तराखंड विद्यालय शिक्षा परिषदेने (UBSE) दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 19 एप्रिल 2025 रोजी जाहीर केला होता. यावर्षी एकूण 90.77 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.25 टक्के आहे, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 88.20 टक्के आहे. कमल सिंह चौहान आणि जतिन जोशी यांनी संयुक्तपणे यावर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोघांनीही 496 म्हणजेच 99.20 टक्के गुण मिळवले आहेत. पण या यशस्वी विद्यार्थ्यांच्या दरम्यान, एका शाळेतील एकमेव विद्यार्थ्याच्या नापास होण्याच्या या घटनेमुळे शिक्षण विभागालाही धक्का बसला आहे.
stay connected