अभिजात मराठी भाषा गौरव दिन
भाषा ही परमेश्वराची रचना असो की मानवाची निर्मिती असो; परंतु भाषेचा जन्म हा चमत्कार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी भाषा कारणीभूत असून भाषेमुळे जगणे अर्थपूर्ण झाले आहे. माणसं विचार मोठा करत असले, तरी त्या विचाराची पेरणी करण्यासाठी भाषा लागतेच.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७फेब्रुवारी हा 'मराठी गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.
भाषावार प्रांतरचनेनंतर लढा देऊन मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आणला. आणि त्यानंतर झालेल्या पहिल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कविवर्य कुसुमाग्रज म्हणाले, "मराठीला आज राजभाषेचे राणी पद मिळाले आहे; पण ही राजभाषा राजमालाच्या बाहेर डोक्यावर राजभाषेचा मुकुट आणि अंगात जीर्ण वस्त्रे घालून दैनिय अवस्थेत उभी आहे".
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक दशकापासून लढा सुरू होता. अखेर केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीसह पाली, प्राकृत,आसामी व बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००४ रोजी तामिळ भाषेला त्यानंतर २००५ रोजी संस्कृत २००८ मध्ये कन्नड व तेलगू व त्यानंतर २०१३ मध्ये मल्याळम आणि २०१४ मध्ये ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला . भारतात आता एकूण११ अभिजात भाषा झाल्या आहेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा तामिळ भाषेनंतर जवळपास वीस वर्षानंतर मिळाला. जगातील११ कोटी लोकांची मराठी भाषा असून जागतिक क्रमवारीत पंधराव्या स्थानावर आहे. असे असून देखील मराठीचा अभिजातपणा सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागला. केंद्र सरकारने अभिजात भाषेसाठी काही निकष ठरवले होते.त्यामध्ये ती भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी. भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. प्राचीन भाषा आणि तिचे आजचे रूप याचा गाभा कायम असावा. या सर्व निकषावर मराठी भाषा अभिजात कशी आहे हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रराज्य शासनातर्फे प्रा .रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून पाचशे पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने सादर केला. अहवाल सादर करताना मराठीचा उच्चार बदलत गेल्याचे त्यात नमूद केलं. महारट्ठी महरठ्ठी म-हाटी आणि मराठी असा उच्चार होत गेल्याचं त्यात सांगितलं.मराठी भाषा अडीच हजार वर्षे जुनी असल्याचेही अहवालात नमूद केले गेले. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
मराठी भाषा ही मूळची आर्यांची भाषा मानली जाते. भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी ही भाषा सातपुडा पर्वतरांगापासून खाली कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली व स्थिरावली. आद्यकवी मुकुंदराज यांनी शके १११० मध्ये पहिला मराठी ग्रंथ विवेकसिंधू लिहिला. इसवीसन ५०० ते ७०० या काळात पूर्व वैदिक, वैदिक नंतर संस्कृत, पाली, प्राकृत या विविध भाषा उत्क्रांत होत मराठी भाषेचा उगम झालेला मानला जातो.
'श्री चामुन्डाराये करविले' असे शिलालेखावरील मराठी भाषेत लिखित पहिले वाक्य श्रावणबेळगोळ येथे असल्याचा दाखला देण्यात आला. मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. मराठी भाषा विभागाने, भाषा संचालनालयाने,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषिकासह मराठी वर प्रेम करणारे जगातील मराठी भाषिक लोकांच्या जागृतीमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मराठी माणसासाठी ऐतिहासिक आहे. ३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी आणखी बळ मिळाले आहे . मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे मुख्यालय रिद्धपूर येथे असणार आहे. यामुळे मराठी भाषेतील अभ्यासाला संशोधनाला चालना मिळणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनाच्या दृष्टीने मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन, साहित्य संग्रह, करणे भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय करणे, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयाचे बळकटीकरण,मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थ्यांना भरीव मदत करता येणे आता सहज शक्य झाले आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे मराठी प्रेमीसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आहे!
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
stay connected