माझा मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेहि पैजा जिंके :- २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिन
माझा मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।
असे म्हणत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान , मराठीची महती व्यक्त केली आहे .अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे , अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली .
मराठी भाषा दिन हा २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो . महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात अर्थात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे योगदान नेहमीच मोलाचे मानले जाते .
मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले होते . आपल्या मराठी मातृभाषेचा गौरव या दिवशी करण्यात येतो . त्यामुळेच कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘ मराठी भाषा गौरव दिन ’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी , २०१३ रोजी घेतला. तेव्हापासून हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो .
मराठी ही राजभाषा : लोकांकडून जेव्हा एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलीभाषा म्हणून वापरली जाते , तेव्हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ नुसार राजभाषा मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो . मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आणि त्यातील गोडीचे साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान कवी कुसुमाग्रज यांनी दिले आहे आणि म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी , २०१३ रोजी त्यांचा वाढदिवस अर्थात २७ फेब्रुवारी हा दिन ‘ मराठी भाषा गौरव दिन ’ साजरा करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली .
उत्तुंग भरारी घेऊ या !
उज्ज्वल भविष्यासाठी एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती मी मराठी , मी मराठी !
शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली , संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली , ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले , आदर्शाचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले , भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी , एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी , दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी !
मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिन फरक :-
बरेचदा मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो . १ मे , १९६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य तयार झाले आणि मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा मानण्यात आले . त्यामुळे १ मे राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . तर २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या मराठीतील योगदानामुळे त्यांच्या वाढदिवशी मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो .
मराठी भाषेचा प्रवास : - मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला . मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे . जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे . उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत , उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला . प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली . मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले . हे वाक्य शके ९०५ मधील असून ‘ श्री चामुण्डेराये करविले ’ असे आहे . शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे . ज्ञानेश्र्वरांनी
‘ परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन । ’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे . महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता , सहजसौंदर्य , नादमाधुर्य , गोडवा दिसून येतो . संत एकनाथांनी
‘ भागवत ’ ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली .
काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली . त्यातूनच मुख्य मराठी , अहिराणी मराठी , मालवणी मराठी ,वर्हाडी मराठी , कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले . शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘ आज्ञापत्रात ’ मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते . इंग्रजी साहितच्या प्रभावामुळे मराठीत निबंध , कादंबरी , लघुकथा , शोकात्मिका असे अनेक नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले . ‘ केशवसुत ’ हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते . आधुनिक कवितेमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाचा , त्यांचा भावनांचा आविष्कार दिसून येतो .
मराठी भाषेतील पद्य आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले . आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा ‘ शेतकर्यांचा आसूड ’ हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो . यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल , नवीन शैलीने रेखाटले आहे . त्यानंतर वि . वा . शिरवाडकर , प्र . के . अत्रे , पु. ल. देशपांडे , चिं . वि . जोशी , कुसुमाग्रज , ग. दि. माडगूळकर , वि. स. खांडेकर , ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली .
मराठी नाटके व सिनेमे यातूनही मराठी भाषेचे विविध पैलू श्रोत्यांना कळत गेले . मराठीत सांगितलेल कळत नाय ? ... इंग्लीशमध्ये सांगू . आर्चीचा हा संवाद भाव खाऊन गेला असला तरी भाषा , संवाद यापलीकडेही चित्रपटाची अशी एक अव्यक्त भाषा असते . चित्रपटाचा मूळ गाभा आहे भाषा .
काय आहेत मराठी भाषेची वैशिष्ट्ये : - भारतामधील २२ अधिकृत भाषांमधील एक भाषा म्हणजे मराठी ही जगातील सर्वाधिक बोलीभाषेपैकी मराठी ही १५ व्या क्रमांकावर असणारी भाषा आहे , तर भारतामधील ३ री भाषा गणली जाते .
सुमारे ८ ते ८.५० कोटी लोक मराठी बोलतात . मराठी ही जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे . काही वर्षांपूर्वी ती १९ व्या स्थानी होती . भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा तिसरा क्रमांक लागतो . हिंदी व बंगाली या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत . मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून महाराष्ट्र , दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली यांची अधिकृत तर गोव्याची दुसरी अधिकृत भाषा आहे . मराठी भाषेच्या अनेक उपबोली आहेत . त्यातील काही प्रमुख बोली : प्रमाण मराठी , अहिराणी , वऱ्हाडी , कोळी , मालवणी , चित्पावनी , दक्षिणी (तंजोर मराठी) , कोल्हापुरी, सातारी , मराठवाडी इत्यादी .
मूळ मराठी भाषा ही मोडी लिपीत लिहिली जात असे. आता मात्र ती बाळबोध (देवनागरी ) लिपीत लिहिली जाते . भारतातील सर्वात प्राचीन वाङ्मयांपैकी काही मराठी भाषेत आहेत . इसवी सन ६०० च्या सुमारास हे वाङ्मयप्रकार लिहिले गेले असावेत . मराठी भाषा ही इंडो-युरोपियन भाषा कुटुंबातील इंडो-आर्यन या उपकुटुंबाची सदस्या आहे . अनेक इंडो-आर्यन भाषांमध्ये ( जसे हिंदी ) दोनच लिंगे मानली जातात . पुल्लिंग आणि स्त्रीलिंग . मात्र मराठी व्याकरणात नपुंसकलिंग सुद्धा आहे .
मराठी भाषेची जुनी आवृत्ती , जिला महाराष्ट्री प्राकृत असे म्हणतात , तीत लिहिलेला शिलालेख जुन्नरजवळ नाणेघाटात सापडला . याचा काळ अंदाजे इसवीसन पूर्व तीनशे वर्षे असावा .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत रुजलेले पारिभाषिक शब्द काढून त्या जागी मराठी शब्द सुचवून मराठी भाषा समृद्ध केली . उदाहरणार्थ - तारीख (फार्सी), दिनांक - मेयर (इंग्लिश) , महापौर.
संत साहित्यातूनही मराठी भाषा समृद्ध होत गेल्याचे दिसते . महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषेला वाङ्ममयाचा मोठा वारसा दिला आहे . संतांनी अभंग , ओव्या , रामायण , आणि इतर साहित्य रचले आहे . यामुळे मराठी भाषेची समृद्धी झाली आहे .
संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला आणि ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत निर्माण केला .
संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात पर्यावरणाचा संदेश आहे .
संत एकनाथांनी ' माझी मराठी भाषा चोखडी ' असे म्हणत काशीमध्ये मराठीचा जयजयकार केला . संत नामदेवांनी आपला मराठीचा झेंडा थेट पंजाबपर्यंत रोवला . संत तुकारामांचे शिष्य निळोबारायांनी अभंग रचून हा काव्यप्रकार घरोघरी पोहोचवला .
९८ वे मराठी साहित्य संमेलन नुकतीच दिल्ली येथे पार पडले . ‘ दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ’ या गीताच्या ओळींना साजेसा हा ऐतिहासिक क्षण पहिल्या बाजीरावाच्या काळात अनुभवला गेला होता . साहित्य संमेलन हे अक्षरनिष्ठांची मांदियाळी असून लेखक , वाचक आणि रसिक यांचा मेळ घडवून आणणारा आनंददायी सोहळा आहे . या संमेलनांमुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध होत गेले आहे .
दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी यावर प्रसारित होणारे विविध मराठी कार्यक्रम यातून विविध बोलीभाषा , संस्कृतीचे दर्शन होते .
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा : - ज्ञानेश्वर माऊलीनी वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे . आज केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे . त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे . गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती . केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते . मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे .
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे . अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात १ ) भाषेचे साहित्ये हे किमान १५०० ते २००० वर्षे प्राचीन असावे लागते २) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे ३ ) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी ४ ) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे . देशात तामिळ , तेलुगू , संस्कृत , कन्नड , मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता . आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे .
या मराठी भाषा दिनी आपण सर्वांनी संकल्प करूया की आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त मराठी बोलण्यास प्रोत्साहित करू . गुड मॉर्निंग ऐवजी शुभ प्रभात असे म्हटले तर भाषेचा सन्मानच वाढेल .
stay connected