ग्रामीण वक्तृत्व स्पर्धेत आरती जिवडे प्रथम तर वस्ती शाळेची आकांक्षा पालवे द्वितीय
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या ग्रामीण शालेय वक्तृत्व स्पर्धेत इंदिरा कन्या विद्यालय धामणगावची आरती नामदेव जीवडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालवे वस्ती येथील आकांक्षा बुवासाहेब पालवे ही द्वितीय आली. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धामणगावची नम्रता राजेंद्र मुळे हिने तृतीय क्रमांक मिळवला. दिव्या पोपट जीवडे व श्रावनी शरद लोखंडे या दोघींनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
वक्तृत्व कलेतून उद्याचे नेतृत्व घडावे या हेतूने मराठा सेवा संघाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी बापूं जंजिरे हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये इंजि. जंजिरे बापू म्हणाले की, समाजातील मोठ्या समुदायासमोर आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्यासाठी वक्तृत्व कला हे प्रभावी माध्यम आहे. शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांनी हा गुण आत्मसात करावा . यापुढील शालेय वक्तृत्व स्पर्धा दिवाळीनंतर खुंटेफळ केंद्रावर घेण्याचे त्यांनी जाहीर केले.
जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा शिवमती सुवर्णाताई गीरे, शिवश्री भास्करराव निंबाळकर, डॉ. दत्ता नरसाळे,शिवश्री बन्सीधर मोरे, सरपंच मनोज गाढवे, शालेय समितीचे अध्यक्ष शरद चौधरी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ. गायकवाड सर, समाजसेवक संतोष दानी सर, व मिलिंद नेटके सर यांनी काम पाहिले.
प्रास्ताविक भाषण संयोजक ऍड सीताराम पोकळे ज्येष्ठ पत्रकार यांनी केले . कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवमती संगीता होळकर मॅडम यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष हिरामण पोकळे सर, मोरे सर, स्नेहलता थोरवे मॅडम, राऊत सर, ढोबळे सर ,यजमान शाळेतील शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन शिवमती हर्षदा जिंजूरके मॅडम यांनी केले.
stay connected