*डि पी प्लॅन रद्द नाही मुख्यमंत्र्यांनी केवळ अहवाल मागीतला जे आमदार प्रांत आणि तहसीलदार यांचे निलंबन रद्द करू शकतात ते विकास आराखडा रद्द करू शकत नाही का ? - राष्ट्रवादीचा सवाल*
---------------------------------------------
*जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण )*
जामखेड - जामखेड शहराचा प्रस्तावित विकास आराखडा मुख्यमंत्र्यांकडून रद्द झाल्याचे भाजप प्रणित कृती समितीने जाहीर केले परंतु तो रद्द झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागीतला असे असताना आ. राम शिंदे यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. जे आमदार प्रांताधिकारी व तहसीलदार ऐकत नाही म्हणून त्यांचे निलंबन करू शकतात त्यांना विकास आराखडा रद्द करणे हा हातचा मळ आहे. आचारसंहिता काही तासातच लागणार असल्याने निवडणूकीच्या तोंडावर मते मिळवण्याचा प्रयत्न आ. राम शिंदे यांनी केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमेश आजबे यांनी पत्रकार परिषदेत केला.
जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द झाला असा दावा प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी बोलताना रमेश आजबे म्हणाले जामखेड शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा हा आयकॉन सिटी मध्ये बसून तयार केला आहे. संतोष फिरोदिया, विशाल शिंदे व गुगळे कंपनी या डेव्हलपरचा त्यामध्ये हात असून या विकास आराखडय़ात त्यांची एक गुंठा जागा जाता नाही व रिंगरोड भोवती यांच्या जमिनी आहेत त्यांना कोणाचा वरदहस्त आहे हे जामखेडच्या जनतेला माहीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर आ. राम शिंदे यांनी मधुकर राळेभात यांचे प्यादे पुढे करून आ. रोहीत पवार यांच्या विरोधात जनतेत रोष निर्माण करीत आहेत. सदर विकास आराखडायातून कोणाचे नुकसान होणार नाही यासाठी आ. पवार यांनी नागरिकांची बैठक नगररचना अधिकारी यांच्या समवेत घेऊन सुचना दिल्या होत्या. आ. पवार यांच्या माध्यमातून न्यायालयात याबाबत याचीका दाखल करणार असल्याचे रमेश आजबे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले, जामखेड शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा चुकीच्या पध्दतीने झाला आहे तो रद्द व्हावा सध्याचा प्रकार ही मताची बेगमी आहे. आचारसंहिता संपल्या नंतर नवीन आराखडा सर्वसमावेशक राहील अशा पध्दतीने होईल व नवनियुक्त पदाधिकारी तसा निर्णय घेतील.
माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात म्हणाले, जामखेड मल्लनिस्सारची मंजुरी आमदार रोहित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मंजुरी आणली होती आणि आज आमदार प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे भूमीपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तसेच प्रारूप विकास आराखडा रद्द झालेला नसताना रद्द केला म्हणून आज भाजप संबंधित बचाव कृती समितीच्या वतीने आमदार प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करत आहेत. ही भुलवाभुलवी आहे. सध्या निवडणूक समोर ठेवून हा खेळ खेळला जात आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, रमेश आजबे, प्रशांत राळेभात, उमर कुरेशी, राजेंद्र पवार, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, अँड. हर्षल डोके, वसीम सय्यद, प्रकाश सदाफुले, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, गणेश घायतडक यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अँड. हर्षल डोके यांनी आभार मानले.
*बचाव कृती समितीच ही भाजपा पुरस्कृत* *झाल्याने समन्वयक अमोल* *गिरमेचा राजीनामा*
----------------------------------------
जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती ही भाजपा पुरस्कृत आहे. ते जनतेची दिशाभूल करत आहेत. हा सगळा खटाटोप गुगळे फिरोदिया व शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून सुरू आहे. त्यामुळे मी या कमिटीतून मी बाहेर पडत आहे असे बचाव कृती समितीचा समन्वयक अमोल गिरमे यांनी जाहीर केले.
*दोन आमदारांमुळे मुख्याधिकाऱ्यांची गोची*
*मुख्याधिकाऱ्यांनी झटकले हात*
-------------------------------
मुख्यमंत्र्यांकडून जे पत्र नगररचना विभाग, विकास आराखडा कृती समिती व नगरपरिषदेला आले त्यासंदर्भात कर्जत - जामखेडला दोन आमदार असल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत मुख्यधिकारी यांची झाली गोची अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया देतांना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले सदर बाब तांत्रिक असून नगररचना विभागाशी निगडीत आहे. त्याबाबत ते अहवाल सादर करतील असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगून प्रस्तावित विकास आराखडा रद्द झाला का नाही याबाबत त्यांनी हात झटकले .
stay connected