कडा सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी 'क्रांती दिना'निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व कामगार युनियनचे धरणे आंदोलन - राम खाडे

 कडा सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी 'क्रांती दिना'निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व कामगार युनियनचे धरणे आंदोलन - राम खाडे




आष्टी प्रतिनिधी - आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळी भागात साखर कारखाना उभा करण्यासाठी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. साहेबराव थोरवे (दादा) यांनी पुढाकार घेऊन गावोगावी फिरून शेतकऱ्यांचे शेअर्स जमा केले. त्यांचे सोबत दादासाहेब खिल्लारे, आसराजी (अण्णा) जगताप, भाऊसाहेब वाळके, मा खा रखमाजी गावडे, तानाजी गर्जे, नारायणराव नरवडे, कारभारी देवकर, वामनराव वाव्हाळ, नामदेवराव भवर, नारायण देसाई, कंटाळे, कराळे,मा आ निवृत्तीराव उगले इत्यादी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होते.

आष्टी तालुक्यात सन 1972 च्या दुष्काळानंतर या कारखाना उभारण्याची मोहीम काँग्रेसच्या राजवटीत घेण्यात आलेली होती. कै. श्रीपतराव कदम हे आमदार झाल्यानंतर या कडा सहकारी साखर कारखान्याच्या कामास गती प्राप्त झाली. सन 1978 साली उभारणी सुरू केली व सन 1980 साली मा खा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होऊन गाळप सुरू करण्यात आले. १२५० टनी क्षमतेचा साखर कारखाना या भागातील विकासाला चालना देणारा ठरला. प्रत्येकी 1000 रुपये शेअर्सची किंमत ठेवून 6000 शेतकरी सभासद करण्यात आलेले होते. विशेष म्हणजे उद्घाटन अगोदर पहिली निवडणूक झाली त्यामध्ये कै. साहेबराव थोरवे (दादा) यांचा संपूर्ण पॅनल विजयी झाला. यांच्या कार्यकाळात कारखाना नफ्यात होता. कारखान्यात 700 कामगार कार्यरत होते. या कारखान्यासाठी जळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी दरात जमिनी दिल्या होत्या. काही जमीन गायरान होती. तब्बल 250 एकर जमिनीवर हा कारखाना उभा आहे. बकवाल या नामांकित कंपनीची मशिनरी असून पूर्ण क्षमतेने गाळप झालेले आहे.

दिे महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेच्या ताब्यात कडा साखर कारखाना असून नियोजना अभावी व गैरव्यवस्थापनामुळे कारखाना तोट्यात गेलेला होता. कर्जाच्या रकमेत व्याजासह वाढ झाल्यामुळे कारखाना बँकेने विक्रीस काढलेला आहे. कडा सहकारी साखर कारखाना राजकीय कुरघोडीमुळे डबघाईला आला. नियोजनाअभावी उसाचे गाळप झाले नाही. सन 2000 नंतर राजकीय कुरघोडीतून कारखान्याची वाताहत झाली. सन 2007- 2008 सुपरटेक फोर्जिंग इंडिया लिमिटेड भोसरी पुणे च्या माध्यमातून पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी झाला. बँकेचे कर्ज, जिल्हा बँकेचे कर्ज, अतिरिक्त कामगार भरती, कामगारांचे देणे, कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाची वाहतूक इत्यादी कारणामुळे कारखाना विक्रीस गेला. जवळपास 50 कोटीचे देणे आहे याबरोबर शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट, ऊसतोड ऊसतोडणी कामगार, वाहतूक इत्यादी बुडीत खात्यात जमा झालेले आहेत. आष्टी तालुक्याचे वैभव असलेल्या साखर कारखान्याची कृत्रिमरित्या हत्या झालेली आहे. या कारखान्याकडे 250 एकर जमीन आहे. राज्य सहकारी बँकेने हा साखर कारखाना विक्रीस काढलेला आहे तो भंगारात विकून जमीन हडप करण्याचे षडयंत्र सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे हे अपयश आहे. या कारखान्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी करीत होते. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न न करता हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले. हा कारखाना पूर्ववत सुरू करण्यात यावा यासाठी मा खा श्री शरदचंद्रजी पवार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ) यांच्याकडे आष्टी तालुक्याच्या वतीने शेतकरी, कामगार, उद्योजक, शेतमजूर यांनी साकडे घातलेले आहे. आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून या साखर कारखान्यामुळे जवळपास 2 हजार कुटुंबांना रोजगार मिळते, दळणवळण सुरू होते, कारखाना परिसरातील बँक, पोस्ट ऑफिस, शाळा, महाविद्यालय, इत्यादी उद्योग धंद्यामुळे हा परिसर गजबजलेला असतो. मा खा शरदचंद्रजी पवार साहेब व मा आ जयंतराव पाटील साहेब यांनी जातीने लक्ष देऊन साखर कारखाना पूर्ववत सुरू करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्रजी पवार गट) लोकसभा सदस्य खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांना जनतेने विजयी केल्यामुळे व त्यांना साखर कारखाना चालविण्याचा अनुभव लक्षात घेता त्यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) व कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने कडा कारखाना परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी 'क्रांती दिना' निमित्त सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत धरणे आंदोलन संपन्न होणार आहे. या धरणे आंदोलनात मतदासंघातील सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन राम खाडे, अध्यक्ष आष्टी विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.