मराठी चित्रपटांना सरसकट अनुदान द्यावे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे कार्याध्यक्ष गोरे यांची मागणी : Filmi News

 मराठी चित्रपटांना सरसकट अनुदान द्यावे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे कार्याध्यक्ष गोरे यांची मागणी




अहमदनगर -

कोरोना महामारीमुळे मराठी चित्रपट निर्मात्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे २०२० पासून अनुदान अपात्र चित्रपटांना सरसकट अनुदान देऊन, पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची स्थापना सन २०१९ मध्ये झाली. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये निर्मात्यांच्या किमान चार पाच संघटना आहेत. मराठी निर्मात्यांची संघटना नसल्याने त्यांची परिस्थिती तर फार बिकट आहे.

मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात प्रेक्षकांचा अल्पसा प्रतिसाद मिळतो. अमराठी कार्पोरेट कंपन्यांच्या मालकाकडून निर्मात्यांचा पाणउतारा होतो. एक निर्माता लाखो, कोटी रुपये खर्च करून शेकडो लोकांचे युनिट सांभाळतो.

मराठी चॅनेल्सनी गेली दोन ते तीन वर्षांपासून चित्रपटाचे हक्क विकत घेणेच थांबिवले आहे. फक्त दलाली घेऊन दलाला मार्फतच एक दोन चित्रपट घेतले जातात. बाकीचे चांगले चित्रपट त्यांना एक ते पाच लाखांत म्हणजे फुकटच पाहिजे असतात. त्यात मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची मनमानी वाढली आहे. हे सर्व निर्मात्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे मराठी निर्मात्यांना त्यांचा हक्क व सन्मान मिळालाच पाहिजे.

त्यासाठी शासनाने मराठी चित्रपट निर्मात्यांना सरसकट अनुदान द्यावे, अशी मागणी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी केली आहे. कलाकारांचे हक्क मिळविण्यासाठी राज्यातील मराठी चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार, कामगार दि. ३० एप्रिल रोजी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त हिंदमाता चौक, दादर (पूर्व) येथील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९ वाजता एकत्र येणार आहेत. यावेळी सरसकट अनुदान मिळावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.