ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी मनरेगा ठरले वरदान - रवींद्र इंगोले

 ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी मनरेगा ठरले वरदान - रवींद्र इंगोले




हंबर्डे महाविद्यालयात सरपंच परिषद उत्साहात संपन्न


आष्टी: महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्यासाठी देशातील खेडी समृद्ध होणे आवश्यक आहेत. आजघडीला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून विविध योजनांच्या माध्यमातून  प्रयत्न केले जात आहेत. त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही अधिक प्रभावी ठरली असून, ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी आणि शाश्वत विकासासाठी मनरेगा एक वरदान ठरले आहे असे गौरवउद्गार काढून रवींद्र इंगोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकप्रशासन राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख  मार्गदर्शक म्हणून यशदा येथील व्याख्याते, जलदूत तथा मनरेगा राज्य प्रशिक्षक रवींद्र इंगोले यांनी उपस्थित राहून सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व मुख्याध्यापक यांना संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण विकासात सरपंचाची भूमिका, ग्रामीण विकासाच्या विविध योजना, अकुशल व कुशल बिले कशी काढावीत? ग्रामीण विकासातील लोकसहभाग, अभिसरण आणि संयोजनाचा निधी कसा मिळवायचा?,  स्वयंपूर्ण खेडी व लखपती संकल्पना, रोजगार हमी योजना याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी सरपंच हा ग्राम स्तरावरील एक जबाबदार घटक असून गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांनी गावच्या विकासासाठी आपला सहभाग नोंदविणे आवश्यक असतो. एकंदरीत आज निश्चितपणे लोकसहभागाच्या माध्यमातून देशात लोकशाही बळकट होत आहे असे महत्वपूर्ण मार्गदर्शन किशोर हंबर्डे यांनी समारोपीय संदेशाच्या माध्यमातून केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अतुलकुमार मेहेर, संचालक प्रा. महेश चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने केली गेली. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून सरपंच परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी केले. संस्थेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाले असून संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. महाविद्यालय तिसऱ्यांदा NAAC ला सामोरे गेले. त्यात महाविद्यालयास  मूल्यांकनात 'अ' दर्जा प्राप्त झाला. आपले महाविद्यालय ग्रामीण भागातील हे एक आदर्श महाविद्यालय म्हणून नावारुपास आले आहे. सामाजिक  उत्तरदायित्वाच्या भावनेने महाविद्यालयाकडून निरंतरपणे विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज महाविद्यालयात सरपंच परिषद होत आहे असे प्राचार्य डॉ. निंबोरे यांनी  सांगितले. याप्रसंगी संवादातून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमास अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर परिषदेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सायली चौधरी तर आभार प्रदर्शन लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. भगवान वाघमारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, उपप्राचार्य अविनाश कंदले, राज्यशास्त्र विभागप्रमुख रमेश भारुडकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रवी सातभाई, प्रभारी प्राध्यापक डॉ. डी.पी. मुंढे, डॉ. मंगेश शिरसाठ, प्रा. निवृत्ती नानवटे, डॉ. अभय शिंदे डॉ. सुहास गोपने, प्रा. महेंद्र वैरागे, प्रा. प्रकाश हंबर्डे, प्रा. दिपाली मस्के, प्रा. सोनवणे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.