ऑस्ट्रेलिया ने सहाव्यांदा जिंकली वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी
भारतीय संघाच्या तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नं स्वप्नच राहिलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह सहाव्यांदा वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी जिंकली आहे.
भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद करून माघारी धाडलं होतं.
वॉर्नर पाठोपाठ मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथने देखील पॅव्हेलियनची वाट धरली. इथून भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केलं होतं. मात्र ट्रेविस हेडचा डोक्यात काहीतरी भलतंच सुरू होतं. त्याने सुरुवातीला संथ खेळी करत डाव पुढे नेला.
त्याला मार्नस लाबुशेनने चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाज एकीकडे विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात होते. तर दुसरीकडे हेड आणि लाबुशेनने एकेरी दुहेरी धाव घेत स्कोअर बोर्ड हलता ठेवला. दोघांनी मिळून मोठी भागीदारी केली. त्यामुळे हा सामना भारतीय संघापासून दूर गेला.
या सामन्यात ट्रेविस हेडने १२० चेंडूत १३७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने त्याला साथ देत ५८ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने ४७ धावांची खेळी केली. तर शुभमन गिल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५४ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा संपूर्ण डाव २४० धावांवर संपुष्टात आला.
stay connected