मराठा आरक्षण प्रश्न तात्काळ मार्गी लागावा..
*********************
आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी - सुरेश धस
**********************************
आष्टी (प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांच्या मागे संपूर्ण मराठवाड्यातील मराठा समाज असून हा मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा..आणि या उपोषण स्थळी पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.. अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली आहे.. मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांना सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या...
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांची समक्ष भेट घेऊन..उस्मानाबाद तथा लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी आंदोलकांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी मराठवाड्यातूनच दरवेळी आंदोलने का होतात ? याचा विचार करण्याची वेळ आली असून या आरक्षण प्रश्नावरील.. बापट आयोगाच्या अहवालामध्ये देखील बीड आणि जालना या दोन जिल्ह्यातील मराठा समाजाची स्थिती चिंताजनक असून या समाजाला आरक्षण देण्यात यावे याबाबत सकारात्मकता दाखवण्यात आलेली आहे
हा मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा कालावधी न लागता मनोज जरांगे यांनी आंदोलन चालू केले आहे याबाबत शासनाने तात्काळ पाऊले उचलावीत आणि योग्य तो निर्णय तात्काळ जाहीर करावा
याबाबत शासन स्तरावर आंदोलकांशी बोलणे सुरू असून याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठका सुरू आहेत असे सांगून यापूर्वी आपण कोपर्डी येथील अमानवी घटनेबाबत तीव्रतेने समाजाची भूमिका महाराष्ट्रभर मांडली होती त्याप्रमाणेच याही प्रश्नी आपण शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करत आहोत मराठवाड्यातील १३० पेक्षा जास्त गावातील मराठा समाजाने या आंदोलनास पाठिंबा दर्शवलेला आहे त्याबद्दल हे आंदोलन उभे करणाऱ्या मायमाऊलींना आपण धन्यवाद देऊन त्यांचे अभिनंदन करत आहोत असे सांगत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस असल्यामुळे आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी काळजी घेण्याची आवश्यकता असून स्थानिक युवकांनी अधिकचा उत्साह दाखवू नये त्यातून मनोज जरांगे यांच्या प्रकृतीला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन करून त्यांनी स्थानिक पातळीवर याबाबतचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
stay connected