आधार लिंक नसल्याने ३२ लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

 आधार लिंक नसल्याने ३२ लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !


बीड  (प्रतिनिधी) - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आधार लिंक नसणे व इतर गोष्टींमुळे राज्यभरातील तब्बल ३२ लाख शेतकरी यावेळच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत.


केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्याच हप्त्याला मुकणार असल्याची सद्य:स्थिती आहे.


अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरवात झाली. दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती दोन हजाराचे (दर चार महिन्यातून एकदा) अर्थसाह्य दिले जाते. आतापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता जूनच्या पहिल्या आठवड्यात चौदावा हप्ता मिळणार आहे.


दरम्यान, मार्चच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली. १ एप्रिल २०२३ पासून त्याचा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. केंद्राच्या निकषांप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष असणार आहेत. केंद्र सरकार जेवढ्या शेतकऱ्यांना लाभ देईल, तेवढ्याच शेतकऱ्यांना राज्य सरकार लाभ देणार आहे. लाभासाठी  शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार लिंक करणे अपेक्षित आहे. तसेच ई-केवायसी आणि संबंधित शेतकऱ्याने त्याच्या नावावरील मालमत्तेची नोंद ऑनलाइन देणे आवश्यक आहे. पण, राज्यातील ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. त्यांनी आगामी काही दिवसांत (चौदावा हप्ता मिळण्यापूर्वी) त्याची पूर्तता केल्यास त्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे..






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.