सलून व्यवसायिकाच्या मुलांचे आकाशाला गवसणी घालणारे यश.स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी बनून आईवडिलांचे स्वप्न केले साकार
प्रतिनिधी : संजय पंडित
पुत्र व्हावा ऐसा,ज्याचा तिन्ही लोकी झेंडा,
या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय नुकताच आष्टी तालुक्यातील कडा येथे आला.
सरकारी स्पर्धा परीक्षा द्वारे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न आजकाल सर्वच मुलं उराशी बाळगतात,पण यश मात्र थोड्याच मुलांच्या नशिबात असते.
मुलांनी योग्य वयात योग्य शिक्षण घेऊन सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपली स्वतःची योग्यता सिद्ध करून आईवडिलांची अधुरी स्वप्न पूर्ण करावी ही प्रत्येक पालकांची ईच्छा असते.याचसाठी आईवडील देखील जीवाचे रान करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करीत असतात.
कडा येथील रमेश पवळ या सलून व्यवसायिकाने देखील अशाचप्रकारे अफाट मेहनत,जिद्द,चिकाटी आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत आपल्या दोन्ही मुलांना उच्य शिक्षण दिले.
दोन्ही मुलांनीही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कठोर परिश्रम घेत प्रतिकूल परिस्थितीत आकाशाला गवसणी घालणारे यश मिळवून आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
एक वर्षापूर्वी मयूर पवळ या त्यांच्या लहान मुलाने एमपीएससी परीक्षेद्वारे घवघवीत यश मिळवून पोलीस दलात पीएसआय पदी नियुक्ती होण्याचा मान मिळविला तर नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या वनविभागाच्या निकालात त्यांचाच दुसरा मुलगा मंगेश याने वनाधिकारी(फॉरेस्ट ऑफिसर) बनण्याचा सन्मान मिळवला आहे.
दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण कडा सारख्या ग्रामीण भागात होऊन देखील त्यांचे हे यश म्हणजे आकाशाला गवसणी घालणारे आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द,कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आईवडिलांच्या स्वप्नाला सत्यात उतरवल्याने आज सगळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याच सोबत सलून व्यवसायिक रमेश पवळ यांच्या धैर्याचे,जिद्दीचे आणि सामर्थ्याचे देखील कौतुक होत असून त्यांचेही अभिनंदन होत आहे.
मंगेशच्या आईवडिलांना ही आनंदाची बातमी कळताच आकाशही ठेंगणे वाटू लागले होते.आनंदाने त्यांचे मन भरून आले होते.आपल्या दोन्ही मुलांच्या यशाने ते भारावून गेले होते.एका सर्व साधारण सलून व्यवसायीकासाठी मुलं सरकारी अधिकारी बनणे ही खुप अभिमानाची बाब आहे.
फॉरेस्ट अधिकारी पदी नियुक्ती झालेला दुसरा मुलगा त्मंगेश पवळ हा तसा सुरुवातीपासूनच निसर्गप्रेमी होता.याच आवडीच्या विषयात करियर बनविण्याची त्याची जिद्द होती. त्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि प्रतिकूल परिस्थिती याची त्याने योग्य सांगड घातल्याने हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.
कडा येथून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने पुण्यातून बीई इलेक्ट्रिकल मधे टेलिकम्यूनिशन शाखेची पदवी प्राप्त केली होती.
२०१६ पासूनच त्याने एपीएससी परीक्षेचा सरावही सुरू केला होता.अपुरी साधन सामुग्री,आर्थिक चणचण,अनेक वेळा येणारे अपयश या सर्व बाबींचा बाऊ न करता केवळ कठोर मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर त्याने ही विजयश्री खेचून आणली आणि आई वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात वास्तवात उतरवल्याचे सांगितले.
नाभिक समाजातील तरुणांनी देखील अशाच प्रकारे परिस्थितीला न डगमगता जिद्दीने स्पर्धा परीक्षांचा सराव करावा,जिद्द,चिकाटी आणि संयमाने भरपुर अभ्यास केल्यास यश हमखास मिळतेच असे भावनिक उद्गार त्याने पत्रकार तथा राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पंडित यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना काढले.
stay connected