गहिनीनाथगडावर संत वामनभाऊंचा 112 फुट उंच पुतळा उभारणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
(बीड प्रतिनिधी) संत वामनभाऊ महाराज यांनी विज्ञान आणि अध्यात्म याची जोड घालून समाजाला दिशा देण्याचे काम केले. दैवी शक्तीच्या माध्यमातून त्यांनी लाखो भाविकांच्या जीवनाचा उध्दार केला. अशा महान संताचे स्मरण आपल्याला कायम प्रेरणा देत आहे. ही प्रेरणा निरंतर राहावी यासाठी संत वामनभाऊंचा 112 फुट उंच पुतळा श्री क्षेत्र गहिनीनाथगडावर उभा केला जाईल. यासाठी 25 कोटी रु.ची तरतुद झाली असून त्याचा आराखडा सर्वांच्या संमतीने मंजुर करु असे जाहिर अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चिंचपुर ता.पाथर्डी येथील जन्मोत्सव सोहळ्या मध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्यांनी हजारो भक्तांशी संवाद साधला.
चिंचपुर येथे सुरु असलेल्या संत वामनभाऊ जन्मोत्सव सोहळ्याचा समारोप काल 3 एप्रिल रोजी झाला. महंत विठ्ठल शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या किर्तना बरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भाविकांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलतांना त्यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की, माता राहीबाई भाग्याची खाण,पिता तुलाजी हा पुण्यवान, पुत्र जन्मला रत्नासमान, तयासी शोभे नाव वामन । अशी ही वामनभाऊंची किर्ती असल्याचे सांगून ते म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या संत भूमीत जन्मलेल्या या महान तपस्वी व्यक्तीमत्वाने वारकरी संप्रदायाची पताका उंच केली.भाऊंच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त गडावर येवून आशिर्वाद घेण्याची संधी मला मिळाली. आणि त्या कार्यक्रमात महंत विठ्ठल महाराजांनी माझ्या हातात गडाचा ध्वज देवून सेवेकरी होण्याचा मान दिला.ही संधी म्हणजे मी माझे भाग्य समजले आणि राज्याच्या अर्थ संकल्पात 25 कोटी रु.ची तरतुद केली. हा निधी मिळण्यासाठी महंतांनी सातत्याने पाठपुरावा केला. गडाचा सेवेकरी म्हणून माझी तर जबाबदारीच होती.संत वामनभाऊंच्या विचाराचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेवून जायचा आहे. विकास आराखड्याच्या माध्यमातून इतर कामांबरोबरच भाऊंचा अर्धाकृती पुतळा व्हावा अशी महंतांची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेनुसारच शासन काम करेल.कोईम्बतुर येथील आश्रमात आदियोगींचा पुतळा ज्या पध्दतीने बनवण्यात आला आहे त्याच धर्तीवर संत वामनभाऊंचा 112 फुट उंच पुतळा बनवला जाईल. ज्यामुळे संतांची प्रेरणा ही कायम स्वरुपी भक्तांना मिळत राहिल.आज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण देशात भाऊंना मानणारा भक्त संप्रदाय लाखोंच्या संख्येत आहे.अठरा पगड जाती, जमातीमध्ये गडाचे भक्त पहायला मिळतात. गहिनीनाथगड हा लाखो भाविकांचा प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे गडाचा महिमा अपरंपार राहण्यासाठी शासनाची आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल असेही ना.फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी महत्वपुर्ण घोषणा केल्याबद्दल महंत विठ्ठल महाराज यांनी त्यांचे आभार मानले.
stay connected