विविध मागण्यांसाठी राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून संपावर
कडा ( वार्ताहर ):- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी दि. २० फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा संघटनेने दिला आहे तसेच बीड जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या प्राचार्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यापूर्वी दि. १८ डिसेंबर २०२१ पासून ११ दिवस चालवलेले काम बंद आंदोलन स्थगित केले होते. तेव्हा पासून आजपर्यंत आमच्या मागण्यांची सोडवणूक झालेली नाही, त्यामुळे शासनाच्या पक्षपाती व अन्यायकारक भूमिकेमुळे विद्यापीठ महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. २ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा कृती समितीने केली आहे. दि. २ फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे होऊ घातलेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकतील. सातव्या वेतन आयोगानुसार वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. १ जानेवारी २०१६ प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला, त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी दि. २० फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
निदर्शने व आंदोलनाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे . दि. २ फेब्रुवारी पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार, दि. १४ फेब्रुवारी रोजी निदर्शने, दि. १५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज करणे, १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, आणि दि. २० फेब्रुवारी पासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
----------------------
stay connected