मेहकरी धरण उशाला अन् कोरड घशालाअभियंता व ग्रामपंचायतचे दुर्लक्षाने ग्रामस्थांना आठ दिवसांपासून पाणी मिळेना
आष्टी (प्रतिनिधी)- भर दुष्काळात संपूर्ण आष्टी तालुक्यातील जनतेची तहान भागविणारे मेहकरी गाव गेली आठ दिवसांपासून धानोरा येथील महावितरण चे उपअभियंता व मेहकरी (कानडी खुर्द) येथील सरपंचासह सदस्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तहानलेलेच आहे. विशेष म्हणजे गावातील सर्वसामान्य नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना अनेकदा तोंडी सांगितले तसेच उपअभियंता यांना सोमवारी (ता.१३) पन्नास नागरिकांनी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचा वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी विनंती करत निवेदन दिले. विशेष म्हणजे येथे मेहकरी धरण तुडूंब भरले असताना 'धरण उशाला अन् कोरड घशाला' अशीच अवस्था दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यातील मेहकरी येथील काही उपअभियंता यांच्या मर्जीतील नागरिकांनी मेहकरी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळील ट्रान्सफॉर्मर अन्यत्र हलवल्याने येथील विद्युत पुरवठा बंद झाला आहे. सदरील ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी बसविला आहे त्या ठिकाणी आकडे टाकून विद्युत चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. जे विद्युत बील नियमित भरतात ते अंधारात तर वीज चोरी करणारे उजेडात हे न उलगडणारे कोडे आहे. विशेष म्हणजे गावातील सर्वसामान्य नागरिकांनी ज्यांना निवडून दिले ते सरपंच सदस्य यांनीच गावाकडे दुर्लक्ष केल्याने दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. पूर्वीच्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणून बसवावा अशी मागणी ग्रामस्थांनी उप अभियंता चंदन पांडे यांना सोमवारी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
________
आमच्या मेहकरी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचा विद्युत पुरवठा मंगळवार (ता.७) पासून बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना प्यायला पाणी नाही. आम्ही उप अभियंता यांना याबाबत सोमवारी निवेदन दिले आहे. निवेदनाची दखल घेतली नाही तर गावकरी लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करणार आहोत.
- मन्सूरखान पठाण
stay connected