शब्दगंधचा कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार ज्ञानदेव पांडुळे यांना जाहीर
अहमदनगर - शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सहावा कॉ. गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे यांना जाहीर करण्यात येत असून येत्या १९ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्वपूर्ण बैठक अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, राजेंद्र पवार,बबनराव गिरी,राजेंद्र चोभे,भगवान राऊत,शर्मिला गोसावी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानदेव पांडुळे हे गेल्या ४० वर्षापासून विविध सामाजिक संस्था,संघटनांमध्ये सक्रिय आहेत.ते रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य असून मराठा नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन आहेत. गुणे शास्त्री आयुर्वेद शिक्षण संस्था,यशवंतराव गाडे शैक्षणिक संस्था मध्ये ते विश्वस्त असून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सल्लागार आहेत. मसाप,नगर च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीने मोफत डबे मिळावेत यासाठी झालेल्या आंदोलनात, वाडिया पार्क झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्य वतीने झालेल्या आंदोलनात सहभागी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांना २१ दिवस जेल ची शिक्षा झाली होती. कॉ. गोविंदभाई पानसरे यांनी शाहू महाराजांवर १०० व्याख्याने देण्याचे ठरवले होते परंतु तत्पूर्वीच त्यांचा खून झाला, यापासून प्रेरणा घेऊन ज्ञानदेव पांडुळे यांनी शाहू महाराजांवरील शंभर व्याख्याने द्यायचे निश्चित केलेले असून आत्तापर्यंत त्यांनी शाळा, महाविद्यालयातून ४२ व्याख्याने दिलेली आहेत.त्यांनी कॉ. पी.बी. कडू पाटील,भाई सथा, नवनीतभाई बार्शीकर, डॉ.बाबा आढाव, कॉ. बाबा आरगडे यांच्या समवेत काम केलेले आहे. अहमदनगर नगरपालिका मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते सत्यशोधक समाज संघटना चे माजी सेक्रेटरी असून शेतकरी व कामगार चळवळी मध्ये कॉ. मधुकर कात्रे, कॉ.सुरेश गवळी, बापूसाहेब भापकर यांच्या समवेत त्यांनी काम केलेले आहे. भाई सत्था यांच्याबरोबर फ्रेंड्स ऑफ डिप्रेशन लिग संस्थेमध्ये ते कार्यरत होते.
ज्ञानदेव पांडूळे यांचे शब्दगंध चे माजी अध्यक्ष प्रमोद देशपांडे,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, प्राचार्य चंद्रकांत भोसले,प्राचार्य शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले,अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.
stay connected