*जिल्ह्यातील पत्रकारांना स्वसंरक्षणार्थ मोफत कराटे प्रशिक्षण देणार !*
*ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सबिल सय्यद यांची घोषणा !*
नगर । प्रतिनिधी
पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस अशी कार्यवाही अद्याप झालेली नाही. यासाठी कायदा तयार करण्यात आला असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनीच स्वत:च स्वत:चे संरक्षण करावे, यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी कराटेचे ऑनलाइन आणि ऑफलाईन मोफत प्रशिक्षण देणार, अशी घोषणा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सबिल सय्यद यांनी केली.
ते म्हणाले, पत्रकारांवर गुंडांकडून हल्ले झाल्यानंतर पोलीस अधिकार्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यापलीकडे काहीही केले जात नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. गुंडांनी हल्ले करायचे, पत्रकारांनी निषेध व्यक्त करत निवेदनाच्या बातम्या छापायच्या, हे कुठपर्यंत चालणार? त्यामुळे आम्ही ही घोषणा करत आहोत. विशेष म्हणजे यासाठी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब शेटे हेदेखील प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील पत्रकारांना कराटेचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी काय करता येईल, हे प्रशिक्षण किती दिवसांसाठी राहिल, या प्रशिक्षणाची वेळ कधीची निवडायची, या प्रशिक्षणाला कधीपासून सुरुवात करायची, यासाठी पत्रकार संघटना आणि युथ कराटे फेडरेशन प्रयत्नशील आहेत. या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा असणार नाहीत. प्रत्येक पत्रकाराकडे पेन असतोच. त्या पेनने स्वसंरक्षण कसे करावे, याचेही प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही सय्यद म्हणाले.
ते म्हणाले, 'राहुरीचे पत्रकार दातीर यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. त्यापूर्वी अनेक पत्रकारांवर प्राणघातक हल्ले झाले. मात्र या पत्रकारांना कराटेचे प्रशिक्षण मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे पत्रकारांनी कराटेचं प्रशिक्षण घेऊन स्वसंरक्षण करण्याची खूप गरज आहे'.
दरम्यान, या प्रशिक्षणासाठी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा उपाध्यक्ष - शिवहरी म्हस्के, जिल्हा सचिव - संजय वायकर, जिल्हा संपर्क प्रमुख - विनोद साळवे, तालुका सचिव- साहिल सय्यद, खजिनदार - संजय भापकर, प्रसिद्धी प्रमुख दादासाहेब आगळे, चिटणीस बाबू तिपुळे, सरचिटणीस रवि भगत तसेच गिरिश रासकर, प्रविण देशमुख, आसावरी वायकर, सागर गायकवाड, अॅड. अमोल थोरात, निरज चांगटे, किशोर चाकोते, अॅड. नवनाथ नरसाळे, अॅड. राजेंद्र करांडे, अॅड. शिवाजी शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.
चौकट
*या प्रशिक्षणात पत्रकारांनी सहभागी व्हावे!*
पत्रकार सय्यद यांनी जिल्ह्यातल्या पत्रकारांना कराटेचं मोफत प्रशिक्षण देण्याची जी तयारी दर्शविली आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. कारण ही काळाची गरज आहे. कराटेतून स्वसंरक्षण करण्याला आपला भारतीय कायदाही मान्यता देतो. त्यामुळे पत्रकार सय्यद यांची ही घोषणा मोलाची असून जिल्ह्यातील पत्रकारांनी या प्रशिक्षणात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायला हवे आहे.
अशी माहिती ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, शिवा म्हस्के यांनी तेज वार्ताशी बोलताना दिली !
stay connected