दुसऱ्याला अडकवयाला गेला आणि स्वतःच जाळ्यात अडकला; कल्याणमध्ये बोगस डॉक्टरला अटक.

 दुसऱ्याला अडकवयाला गेला आणि स्वतःच जाळ्यात अडकला;
कल्याणमध्ये बोगस डॉक्टरला अटक.



प्रतिनिधी : संजय पंडित


दि ३ कल्याण (ठाणे) : दुसऱ्यासाठी खड्डा खणताना आधी स्वतःलाच खड्ड्यात उतरावे लागते, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय अंबरनाथ रेल्वे स्थानकात आला. रेल्वे हॉस्पिटलचा डिव्हिजनल डॉक्टर असल्याचं भासवून वावरणाऱ्या एका बोगस डॉक्टरला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकी इंगळे असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून स्टेटोस्कोप, रेल्वे व शासनाचे पाच खोटे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात चार ते पाच अल्पवयीन मुलांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करत तो टीसीकडे गेला होता. त्याने आपण रेल्वे हॉस्पिटलमध्ये डिव्हिजनल डॉक्टर असल्याचे सांगितले. मात्र टीसीला संशय आल्याने त्याचे बिंग फुटले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,अंबरनाथ रेल्वे स्थानकातील टीसी कार्यलयात शनिवारी विकी इंगळे हा चार ते पाच अल्पवयीन मुलांना घेऊन गेला. या तरुणांकडे तिकीट नसल्याचे सांगत त्यांना दंड करा असे तो टीसीला सांगत होता. यावेळी विकी इंगळे याने आपण रेल्वे हॉस्पिटलमध्ये डिव्हिजनल डॉक्टर असल्याचं सांगत आपले ओळखपत्र दाखवले मात्र टीसीला त्याच्यावर संशय आला. त्यांनी याबाबत कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असता त्याचे ओळखपत्र बनावट असून तो बोगस डॉक्टर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं.

पोलिसांनी विकी इंगळेला ताब्यात घेत त्याच्याकडून स्टेटस्कोप, डॉक्टरचे साहित्य, रेल्वे व शासनाचे पाच ओळखपत्र जप्त केले. विकीने हे ओळखपत्र का व कोठून बनवले ? या ओळखपत्राचा गैरवापर केला आहे का ? याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असल्याची माहिती कल्याण महिला पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.