अंबरनाथच्या चिखलोली धरणात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला:
शिवाजी नगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद...
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.३अंबरनाथ ( ठाणे) : अंबरनाथच्या चिखलोली धरणात आज एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. अग्निशमन दलाने हा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस याबाबत शोध घेत आहेत. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान चिखलोली परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
अंबरनाथ शहराला लागूनच चिखलोली धरण असून या धरणात एक अज्ञात मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धरणावर धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस प्रयत्न करीत आहेत.
चिखलोली परिसरातील मोकळ्या जागेत आढळला मृतदेह
याआधी शुक्रवारीही अंबरनाथमध्ये एका अज्ञात इसमाचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत शुक्रवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला होता. मृत इसमाचे वय ३० ते ३५ दरम्यान असून तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रात्रीच्या सुमारास त्याची हत्या झाल्याचा अंदाज असून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहेत. या इसमाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. अंबरनाथ पश्चिम पोलीस पुढील तपास करत आहेत.
stay connected