क्लासला जाते म्हणून निघाली,
थेट बंगालला पोहचली....?
मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीचे अपहरण...!
प्रतिनिधी : संजय पंडित
बदलापूर (ठाणे) : मोबाईल गेमच्या नादी लागून एका मुलीनं तिच्या मित्रासोबत घर सोडलं आणि थेट बंगालला पोहोचली. याबाबत मुलीच्या घरच्यांनी तिचं अपहरण केल्याची तक्रार केली आणि मुलगी बंगालला पोहोचताच पोलीस तिच्या स्वागतासाठी स्टेशनवर उभे ठाकले. एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा तपास उल्हासनगर क्राईम ब्रॅंचनं केलाय. तसंच मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तिच्या मित्रालाही बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या दोन वर्षांपासून फ्री फायर या मोबाईल गेमिंग अॅपचा नाद लागला होता. याच गेमिंग अॅपवर तिची पश्चिम बंगालमधील एका तरुणासोबत ओळख झाली आणि ती त्याला भेटण्यासाठी ती घर सोडून गेली.
गेमिंग अॅपवर अल्पवयीन मुलीची आरोपीशी ओळख झाली
अल्पवयीन मुलीची गेमिंग अॅपवर पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात राहणाऱ्या एस. के. बुद्धू या २२ वर्षीय तरुणाशी ओळख झाली आणि प्रेमसंबंध तयार झाले. त्यातूनच कधीच प्रत्यक्षात भेट न झालेल्या या दोघांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ही मुलगी क्लासला जाते, असं सांगून घराबाहेर पडली. मात्र तिथून तिने थेट कल्याण स्टेशन गाठलं. तिथे तिचा प्रियकर एस. के. बुद्धू याच्यासह कर्मभूमी एक्स्प्रेस पकडून हे दोघं बंगालला रवाना झाले. इकडे मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्यानं मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार केली. यानंतर उल्हासनगर क्राईम ब्रॅंचनंही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये मुलीला पकडले
पोलिसांनी मुलीचे मोबाईल लोकेशन तपासले असता ती कल्याण रेल्वे स्थानकावर असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानुसार सीसीटीव्ही आणि रिझर्व्हेशन चार्ट तपासला असता, ती कर्मभूमी एक्सप्रेसनं बंगालला गेल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार या गाडीचं लाईव्ह लोकेशन घेत पोलिसांनी पश्चिम बंगालच्या रेल्वे पोलिसांना संपर्क साधला आणि पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील डानकुणी रेल्वे स्थानकावर या दोघांनाही उतरवून घेण्यात आलं. यानंतर मुलीचे कुटुंबीय आणि क्राईम ब्रँचचे पोलीस यांनी विमानानं जाऊन या दोघांना परत आणलं. यापैकी मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिचा प्रियकर एस. के. बुद्धू याला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.
बदलापूर शहरात यापूर्वीही डिसकॉर्ड नावाच्या मोबाईल गेमच्या नादी लागून एका 13 वर्षांच्या मुलानं घर सोडून गोवा गाठलं होतं. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे
stay connected