*रमाई घरकुल बांधकाम चौकशीची महादेव गायकवाड यांची मागणी*

 *रमाई घरकुल बांधकाम चौकशीची महादेव गायकवाड यांची मागणी*

 


घाडगे रंजीत/केज (दि.१० ) :- केज तालुक्यातील  देवगाव येथील सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड यांचे पती तथा रोजगार सेवक शिवाजी आण्णा गायकवाड यांनी आपल्या पदाचा व सत्तेचा गैरवापर करत ग्रामसेवक खामकर यांना हाताशी धरून रमाई आवास घरकुल योजनेत २०१९-२० वर्षात सहा घरकुल मंजूर करुन घेतले. मंजूर घरकुलाचे बांधकाम न करता कागदोपत्री बांधकाम झाल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याचे उघड होताच देवगाव येथील महादेव दशरथ गायकवाड यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी केजचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन देवगाव येथील सहा रमाई घरकुल बांधकामाची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.


 या बाबतची माहिती अशी की,  केज तालुक्यातील देवगाव येथील विद्यमान सरपंच सौ. सुरेखा शिवाजी गायकवाड यांनी व त्यांचे पती तथा रोजगार सेवक शिवाजी आण्णा गायकवाड यांनी आपल्या सत्तेचा व पदाचा गैरवापर करित ग्रामसेवक यांच्या संगनमताने सरपंच यांच्या सासु असलेल्या शांताबाई आण्णा गायकवाड आणि बापूराव मारुती गायकवाड, नवनाथ सखाराम गायकवाड, राजेंद्र भिमराव पाटोळे, राणू दैवान कांबळे, विजय आप्पाराव कांबळे या सहा लाभार्थ्यांना सन २०१९-२०२० वर्षात रमाई आवास योजनेतील घरकुलांना मंजूरी मिळाली होती. या मंजूर लाभार्थ्यां मधील बापूराव मारुती गायकवाड, राजेंद्र भिमराव पाटोळे, विजय आप्पाराव कांबळे यांची देवगाव ग्रामपंचायत मिळकत नमुना नंबर-८ अ मध्ये नोंद नाही. तर शांताबाई आण्णा गायकवाड यांच्या गाव नमुना नंबर ८-अ च्या रजिस्ट्रवर अ. क्र.३९४ वर सन २०१३ -२०१३ या वर्षात घरकुल व शौचालय बांधकाम पूर्ण केल्याची नोंद असतांना देखील विद्यमान सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड व त्यांचे पती तथा देवगाव ग्रामपंचायतचे रोजगार सेवक शिवाजी आण्णा गायकवाड यांनी ग्रामसेवक खामकर यांना हाताशी धरून बोगस पी. टी. आर तयार करुन घरकुलाचे १ लाख २० हजार रुपये चार हप्त्यात उचलून घेतले मात्र त्यांनी नवीन घरकुल व शौचालयाचे बांधकाम केले नाही. दोन वर्षा पुर्वी केलेल्या जून्या बांधकामाचे फोटो दाखवून शासनाचा निधी उचलून अपहार केला. विजय आप्पाराव कांबळे यांनी देखील बांधकाम न करता ६९ हजार रुपये दोन हप्त्यात उचलले आहेत.


बापूराव मारुती गायकवाड यांनी एक हप्त्याचे १५ हजार रुपये घेऊन देखील बांधकाम केलेले नाही. राजेंद्र भिमराव पाटोळे यांनी एका हप्त्याचे १५ हजार रुपये घेऊन सुद्धा बांधकाम केले नाही. नवनाथ सखाराम गायकवाड यांनी दोन हप्त्याचे साठ हजार रुपये घेऊन  बांधकाम बेसमेंट केले आहे. राणू दैवान कांबळे यांनी एका हप्त्याचे १५ हजार रुपये घेऊन बांधकाम हे लेंटल लेव्हल पर्यंत केले आहे. तरी देखील सरपंच पती व ग्रामसेवक यांनी कागदपत्रांची अडचण दाखवून त्यांचे घरकुलाचे पुढील हप्ते अडविले आहेत. सरपंच यांच्या सासुबाई यांना घरकुलाचा निधी लवकर मिळावा म्हणून जुन्याच बांधकामाच्या फोटोवर ग्रामसेवक खामकर यांनी सह्या करून दिल्याने बांधकाम तांत्रीक अधिकारी ढाकणे यांनी सही केल्याचे आढळून आल्याने देवगाव येथील रमाई घरकुल बांधकामाची चौकशी करून शासनाचा निधी हडप करण्यासाठी मदत करणाऱ्या सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड, रोजगार सेवक शिवाजी आण्णा गायकवाड, ग्रामसेवक खामकर, तांत्रीक अधिकारी ढाकणे यांच्यासह बोगस निधी मिळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची १५ फेब्रुवारी पर्यंत चौकशी करून योग्य ती कठोर कार्यवाही करावी. अन्यथा १६ फेब्रुवारी नंतर अंदोलन करण्यात येईल असा ईशारा तक्रारदार महादेव दशरथ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांना  निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.